मयुरेश कोण्णूर
बीबीसी प्रतिनिधी
9 एप्रिल 2018
प्रतिमा मथळा मुमताज शेख
मुमताज शेख यांना जे जमलं ते फार थोडक्या स्त्रियांना जमतं. त्यातही जर तुम्ही मुस्लीम समाजातल्या असलात तर त्यांनी जे केलं ते करायला मोठी किंमत द्यावी लागते. ती मुमताज यांनी दिली.
पण त्यांना आता वाटतं की त्यामागे बळ केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. चालायला लागल्या तेव्हा माहीत नव्हतं, पण आता एका मुक्कामी पोहोचल्यावर मागे बघतांना त्यांना वाटतं की त्या बाबासाहेबांच्या 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या सांगितलेल्या रस्त्यावरच चालत गेल्या.
"बाबासाहेब आंबेडकरांबद्दल शाळेमध्ये अगदी सुरुवातीला जे ऐकलं होतं त्याच्या मागेपुढे काहीही माहीत नव्हतं. मला तर 'जय भीम' म्हणायलाही लाज वाटायची, मी कम्फर्टेबल नसायचे"
"तोपर्यंत ते दलितांचे कोणीतरी आहेत, संविधान हे त्यांनी दलितांसाठी लिहिलेलं आहे, असंच काहीतरी माहीत होतं. निळ्या रंगाचं आम्ही काही घालायचो नाही कारण तो 'त्यांचा' रंग आहे असं सांगितलं होतं... ", मुमताज सांगतात.
"माझ्या आयुष्याकडे तुम्ही पाहाल तर मी शिकायला लागले आणि माझ्यासारख्या ज्या महिला आहेत त्यांना संघटित करून संघर्ष करायला लागले. हा सगळा बाबासाहेबांचा प्रभाव आहे. पण तो ठरवून नाही. ते म्हणाले होते की, 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.' मी बाबासाहेबांचं पुस्तक वाचलं आणि त्यातली ही ओळ पाहून असं वागू या असं ठरवलं, असं काही झालं नाही. ते कळत नकळत होत गेलं. आता 'जय भीम' म्हणणं हे किती अभिमानास्पद वाटतं हे कसं सांगू? सांगतांनाही आता अंगावर काटा आला," बोलतानाही मुमताज यांचा आवाज कातर होतो.
मुंबईच्या वस्त्यांसोबतच महाराष्ट्रभर प्रौढ साक्षरता, कौटुंबिक हिंसा, बलात्कार पीडितांचं पुनर्वसन आणि 'राईट टू पी'च्या मोहिमेच्या माध्यमातून शौचालयांसाठी चळवळ चालवणाऱ्या, महाराष्ट्रभर ओळख असलेल्या मुमताज शेख यांचं व्यक्तिगत आयुष्य पाहिलं की या त्यांच्या रस्त्याची कल्पना येते आणि बाबासाहेबांबद्दल त्या अशा भावूक का होतात हेही समजतं.
मुमताज स्वत:च्या आयुष्याला एखाद्या सिनेमाची कथाच समजतात, इतकी वादळं आणि वळणं त्यात आहेत त्यात. एका गरीब मुस्लीम कुटुंबात त्या जन्मल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना समान हक्क मिळावेत म्हणून लढा दिला. आज 21व्या शतकात हेच आंबेडकर जगभरातल्या विविध समान हक्क चळवळीतल्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहेत. महिलांपासून समलैंगिकांपर्यंत आणि अफ्रिकेपासून युरोपापर्यंत ते हजारो तरुण-तरुणींनाजगण्याची उमेद आणि संघर्षासाठी बळ देत आहेत. अशाच लढवय्यांच्या या कहाण्या सांगणारी बीबीसीची सीरिज #आंबेडकरआणिमी 14 एप्रिलच्या आंबेडकर जन्मदिवसाच्या निमित्ताने...
आई अहमदनगरच्या कर्जत तालुक्याची आणि वडील केरळचे. पण कामासाठी म्हणून हे कुटुंब मुमताज 7 वर्षांची असतानाच मुंबईत आलं आणि त्यानंतर चेंबूरच्या वाशीनाक्याजवळची सह्याद्रीनगर ही वस्तीच त्यांच्या पटकथेसारख्या वाटण्याऱ्या आयुष्याचा सेट बनला.
वडील भावाला घेऊन घर सोडून निघून गेले आणि मागे उरल्या फक्त आई आणि लेक. आई जगण्यासाठी आश्रित म्हणून दुसऱ्या एका कुटुंबात राहू लागली म्हणून मुमताजला मामाकडे ठेवण्यात आलं.
नववीपर्यंत शाळा झाली, पण त्यानंतर इतर कोणत्याही गरीब आणि पारंपारिक मुस्लीम कुटुंबात होतं तेच झाली. पंधरावं वर्षं उलटताक्षणी लग्न लावून देण्यात आलं.
'कोरो'नं आयुष्याला वळण दिलं
"नववीत मी नापास झाले आणि मग 15 वर्षांची झाल्यावर माझं लग्न लावून देण्यात आलं. लगेचच पुढच्या वर्षी मला मुलगीही झाली. मी कायम म्हणते की माझं आयुष्य एकदम फिल्मी आहे. म्हणजे लग्न, मग मुलगी झाल्यावर वगैरे वाटलं की आता सिनेमासारखा हॅप्पी एंडिंग आहे. पण तसं नव्हतं," मुमताज सांगतात.
'कोरो' म्हणजेच 'कमिटी ऑफ रिसोर्स ओर्गनायझेशन' या संस्थेनं त्यांच्या आयुष्यात प्रवेश केला आणि चित्रपटाच्या पटकथेसारखंच त्यांच्या आयुष्यानं आणखी एक, पण निर्णायक वळण घेतलं.
"2000 साली 'कोरो' आयुष्यात आली आणि सगळंच बदललं. 'कोरो' आमच्या सह्याद्रीनगरच्या वस्तीत एका सर्वेक्षणासाठी आली होती. त्यानंतर त्यांच्या काही बैठका चालल्या होत्या", त्या सांगतात.
"मी माझ्या घराच्या खिडकीतून ते पाहायचे सगळं. मला घराबाहेर जाण्याची परवानगी नव्हती. शौचालयात जायचं असेल वा पाणी भरायला जरी जायचं असेल तरी विचारून जायला लागायचं. मला मात्र उत्सुकता होती की हे कोण लोक आले आहेत, काय सर्वेक्षण करत आहेत वगैरे. मग शेवटी एका मीटिंगला मी चोरून गेले आणि ऐकलं की ते काय बोलताहेत...."
"महेंद्र रोकडे सांगत होते की, तुमच्या वस्तीत लाईट नाहीयेत, पाणी नाहीये, कचरा इथेच पडला आहे आणि आता आम्ही इथे काम करणार आहोत. मला मुळात हा प्रश्न पडला की ही आमची वस्ती, आम्ही इथे राहतो, मग तुम्ही का काम करणार? आम्ही हे काम करायला पाहिजे ना?"
"मी त्यांना तसं विचारलं, मग ते म्हणाले की, या तुम्ही आणि करा", मुमताज आठवून सांगतात, पण अगदी काल घडल्यासारखं.
"माझ्यासाठी ते खूपच अवघड होतं. घरातून बाहेर पडताच येत नव्हतं. मी त्यांना विचारलं की काय करता येईल मग आपल्याला? त्यांनी मला प्रौढ साक्षरतेच्या वर्गांबद्दल सांगितलं. ते जरा तुलनेनं माझ्यासाठी सोपं होतं. घरातल्यांनाच शिकवायचं होतं, माझी नववी झाली होती. परवानगीसाठी मला ते अडचणीचं वाटलं नाही. मग मी क्लासेस घ्यायला लागले. मग वस्तीमध्येच 'कोरो'च्या कार्यकर्त्यांची ट्रेनिंग्स व्हायला लागली."
"तिथे मला पहिल्यांदा समजलं की काहीतरी 'भारताचं घटना' अशी गोष्ट आहे. त्यात महिलांच्या अधिकारांविषयी लिहिलं आहे. आपण सगळे समान आहोत असं लिहिलं आहे. मला त्या दृष्टीने समज यायला लागली आणि त्यानंतर मी माझ्या स्वत:च्या आयुष्याकडे पाहायला लागले. मला समजलं की इथे काहीतरी गफलत आहे. आपण जे म्हणतोय ते आणि तिथे जे सांगताहेत ते, यात फरक आहे," मुमताज यांना आता स्वत्वाची जाणीव होत होती.
मुळातच विचारी असणाऱ्या या तरुणीच्या त्या जाणीवेत काही नवे विचार येत होते. पण एक साक्षात्काराचा क्षण येणार होता आणि लवकरच तो आला.
'मूमेंट ऑफ रियलायझेशन'
"'कोरो'नं माझ्यावरची जबाबदारी वाढवली होती. एक समस्या नोंद केंद्र सुरू झालं होतं आणि ते मी चालवायला लागले. तेव्हा तिथं एक कुटुंब तक्रार घेऊन आलं होतं. त्यांच्यात वाद होते. मी त्यांना सांगायला लागले की नवरा-बायकोनं एकमेकांना सन्मान द्यायला पाहिजे, हिंसा नको, आपण सगळे समान आहोत वगैरे. तेव्हा तो इसम मला म्हणाला की, तू काय आम्हाला शिकवतेस? तुझ्या घरात बघ काय चाललंय... "
"त्या प्रश्नानं मग मनात ठिणगी पेटली. सुरुवातीला राग आला, पण त्याचं बरोबर होतं. आपण जर असं वागलो नाही तर लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत. मग माझा स्वत:चा संघर्ष सुरु झाला," मुमताज म्हणतात. त्या एका प्रश्नानं अजून एकदा आयुष्य बदललं होतं आणि त्या पुन्हा एक निर्णय घ्यायला तयार झाल्या होत्या.
"माझ्या घरात मी सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू केला, माझ्या नवऱ्याला समजावायला सुरुवात केली. पण असं लक्षात आलं की, तो काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. मग मी कुटुंब न्यायालयात गेले, घटस्फोट घेण्याचा विचार केला. पण तिथंही माझ्या हाती काहीही लागलं नाही."
"मग मी मुस्लीम कायद्याप्रमाणे 'खुला'अशी एक पद्धत आहे, तिचा अभ्यास केला. त्यानंतर मला असं समजलं की मला याच्यातून तलाक मिळू शकतो. मग मी तलाकच्या मागे लागले."
"पण हे सगळं होत असतांना माझ्या आईला काही हे सगळं सहन होत नव्हतं. इतकं लहानपणापासून घरात हिंसा पाहूनही न बोलता सहन करणारी ही मुलगी आत्ता कशी बोलायला लागली असा प्रश्न तिला पडला. तिला वाटायला लागलं की 'कोरो'नं मला हे असलं काहीतरी शिकवलंय. मग ती एक स्टॅंपपेपर घेऊन आली आणि म्हणाली की 'कोरो' देतंय त्यापेक्षा जास्त पैसे मी तुला देईन असं लिहून देते, पण तू हे थांबव."
"पैसा हा माझ्यासाठी मुद्दाच नव्हता. माणूस म्हणून मला जी समानतेची जाणीव होत होती ती मला स्वस्थ बसू देत नव्हती. आईनं मला आणि माझ्या मुलीला घरातून बाहेर काढलं," मुमताज त्या अग्निदिव्यासारख्या काळाबद्दल सांगतात. पण त्या मागे फिरणार नव्हत्या.
नवा संसार, नवं आयुष्य
"त्यादरम्यान 'कोरो'ची एक फेलोशिप मला मिळाली. माझं मंगळसूत्र मी विकलं. त्यातून जे पैसे मिळाले त्यातून घर भाड्यानं घेतलं आणि माझी मी स्वतंत्र राहू लागले."
"माझं कामही मी सुरू ठेवलं. पुढच्या साधारण वर्षभरात माझा तलाकही झाला. आईला तेही पटलं नाही. एके दिवशी येऊन तिनं मला खूप मारहाण केली.
मी आईच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली. हे सगळं इतकं पराकोटीला गेल्यावर मग नंतर शांत झालं. आईला समजलं की मी काही अशी शांत होणाऱ्यांमधली नाही," मुमताज यांच्या आवाजात आपण अखेरी जे हवं होतं तिथं पोहोचलो असा भाव असतो.
त्यानंतरही आयुष्यात काही आव्हानं असणार होती, वळणं येणार होती.
"या सगळ्याचा परिणाम माझ्या मुलीवर मात्र झाला. ती एकदम शांत झाली. मीही घाबरले. वाटलं की जिच्यासाठी मी हे सगळं करते आहे तीच जर सोबत राहिली नाही तर काय उपयोग? मग मी समुपदेशकाकडे तिला घेऊन गेले.
संस्था या काळात खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. आमच्याच संस्थेचे राहुल गवारेही त्यात होते. माझी मुलगीही त्यांच्याकडेच व्यवस्थित रहायची. थोड्या काळानं ती व्यवस्थितही झाली.
राहुलने मग मला लग्नासाठी विचारलं. मला खरं तर इतकं सोसल्यावर परत त्याच गोष्टीकडे जायचं नव्हतं. पण माझी मुलगीही तू हे लग्न कर असं म्हणायला लागली. मग आम्ही दोघांनी लग्न केलं," आता आपल्या इच्छेनं आणि अधिकारानं नवा संसार सुरू केलेल्या मुमताज या नव्या वळणाबद्दल सांगतात.
स्वत:चे अधिकार मिळवणं हा एकमेव उद्देश त्यांच्या आयुष्याचा राहिला नव्हता. ज्या 'कोरो'नं त्यांना नवं आयुष्य दिलं त्याचं काम वाढवत जाणं हा नवा उद्देश बनला होता. 'कोरो'चं काम वाढत गेलं. पहिली ते चौथीच्या मुलांचे स्टडी सेंटर्स चालवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. प्रौढ साक्षरतेचे वर्ग सुरू होतेच. शिवाय सहाय्यक समुपदेशक म्हणून काम केलं.
एका पूर्ण विभागाची जबाबदारी उचलली. मुमताज यांना अनेक फेलोशिप्स मिळाल्या. 'महिला मंडळ फेडरेशन' नावाची एक संघटना आहे, त्याची निवडणूक त्यांनी लढवली आणि कार्याध्यक्ष म्हणून निवडूनही आल्या.
'कोरो'च्या सहसचिव म्हणून काम पाहिलं. सध्या 'राईट टू पी', कौटुंबिक हिंसा आणि बलात्कार पीडितांच्या पुर्नवसनाच्या प्रकल्पांवर प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून त्या काम करताहेत. त्याशिवाय 'संविधान संवर्धन समिती'सोबतही काम करताहेत.
'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा'चं पालन
मुमताज शेख यांच्या या सगळ्या आयुष्यपटाकडे पाहिल्यावर लगेच कळून येतं की बाबाहेबांच्याच 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या सांगितलेल्या रस्त्यावरच त्या चालत होत्या, असं त्या का म्हणतात.
"म्हणूनच 'कोरो'त काम करताना किंवा 'संविधान संघर्ष समिती'त काम करताना, मुस्लीम लोकांपर्यंत बाबासाहेब कसे नेता येईल याचा प्रयत्न मी करते.
कारण जो समज कधी माझा होता, तोच समज माझ्या समाजातल्या इतरांचाही आहे. त्यांना कोणीतरी बांधून ठेवलंय आणि त्यांना बाबासाहेब कोणत्यातरी एका गटाचे वाटतात. हा समज तोडून टाकायला पाहिजे. तो संघर्ष स्वत:पासूनच आहे हे मला माझ्या स्वत:च्या अनुभवावरूनच समजलं आहे," मुमताज म्हणतात.
"आम्ही जास्त काम महिलांसोबत, त्यांच्या समानतेच्या अधिकारांसाठी करतो. त्यावेळेस काहीही समजावतांना जास्त भर आम्ही संविधानावर देतो. मग कोणीही कोणत्या धर्माचं असो वा जातीचं, आम्ही संविधानाबद्दल बोलतो आणि ते कोणी दिलंय याबद्दल.
काही दिवसांपूर्वी आम्ही एक रॅली आयोजित केली होती आणि त्यात मुस्लीम समाजातले पुरुष आणि महिला दोघंही पुढे येऊन बोलले होते की आता त्यांना बाबासाहेबांबद्दल काय वाटतं ते, त्यांनी आमच्यासाठी काय केलं ते. आम्हालाही हे सगळं सांगण्याची ताकद आली कारण काम संविधानावर आधारित आहे आणि जिथं संविधान येतं तिथं बाबासाहेब येतात," मुमताज त्यांचं कार्यात बाबासाहेबांचा आधार कधी आणि कसा मिळतो हे सांगतांना म्हणतात.
मुमताजना हेही सतत वाटत राहतं की, बाबासाहेब त्यांच्या कार्यामागची प्रेरणा तर आहेतच, पण ते मुमताजच्या कामाकडे पाहताहेत.
"बाबासाहेबांचे अनेक फोटो मी पाहिलेले आहेत. पण माझ्याकडे एक त्यांचा फोटो आहे. तो फोटो पाहिला ना की आपण त्या माणसाच्या प्रेमातच पडतो. त्यांचे डोळेच बोलतात. तुम्ही जे काही करता, ते पाहत असतात. माझ्या प्रत्येक कृतीत ते असतात. मला लढण्याचं बळ त्यांनी दिलं आहे. माझ्या बोलण्यातली ही जी ताकद आहे ना ती त्यांच्यामुळे मिळाली आहे," मुमताज शेवटी म्हणतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा