सुधारक ओलवे
फोटोजर्नलिस्ट
1 मे 2018
प्रतिमा मथळा - माणिकचा भाऊ श्रावण उडगे आणि त्याची आई
अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या एका निर्णयानंतर देशभरात हिंसक निदर्शनं झाली. या पार्श्वभूमीवर फोटोजर्नलिस्ट आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधारक ओलवे यांनी मुंबईत अॅट्रॉसिटीविषयासंदर्भातल्या छायाचित्रांचं एक प्रदर्शन भरवलं. त्यातली ही छायाचित्रं आणि त्याबरोबरच ओलवेंनी मांडलेला अॅट्रॉसिटी घटनांचा लेखाजोखा...
सुप्रीम कोर्टानं दिलेल्या नव्या निर्णयानुसार अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास आरोपीला लगेचच अटक करता येणार नाही. तसंच तपास करून पुढील कारवाई करता येईल असं कोर्टानं म्हटलं.
दलित अत्याचाराची घटना घडल्यानंतर पोलीस तक्रार घ्यायला किती वेळ लावतात? किती कालावधीनंतर गुन्हा दाखल होतो? त्यानंतर कोर्टात केस कधी उभी राहते? निकाल कधी लागतो? वेळकाढूपणा करणाऱ्या यंत्रणेवर काय कारवाई होते? असे अनेक प्रश्न अॅट्रोसिटी कायद्याची हेटाळणी करणाऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, असं ओलवे म्हणतात. त्यांनी दिलेली ही उदाहरणं -
1. आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून जिवे मारलं
पुण्यातील चिखली इथे राहणाऱ्या उडगे कुटुंबात माणिक हा एकमेव कमावता मुलगा होता. व्यवसायाने कंत्राटदार असलेल्या माणिकने 'संविधान प्रतिष्ठा' नावाची एक संस्था स्थापन केली होती.
14 एप्रिल 2014 रोजी आंबेडकर जयंती साजरी करणाऱ्या माणिकला मध्यरात्रीच्या सुमारास वस्तीतल्या चौघांनी त्याच्या घराबाहेर काढून स्टीलच्या रॉडने निर्घृणपणे मारहाण केली. त्यातच माणिकचा मृत्यू झाला.
ज्यांच्यावर हत्येचा आरोप आहे, ते आज तुरुंगात आहेत. पण अजून त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झालेला नाही. कोर्टाने या आरोपींचा जामीन आतापर्यंत अनेकदा फेटाळला आहे. माणिकचा लहान भाऊ श्रावण अजूनही भीतीच्या सावटाखाली जगतो आहे.
2. सार्वजनिक विहीर खणली म्हणून हत्या केली
दिनांक 26 एप्रिल 2007 : साताऱ्यातील कुळकजाई या गावचं मधुकर घाडगे यांचं कुटुंब एका दलित बौद्ध आणि सुशिक्षित कुटुंबांपैकी एक होतं. ते गावासाठी विहीर खणत होते. मात्र हा प्रकार काही लोकांना आवडला नाही.
त्यात 12 जणांच्या टोळक्याने मधुकर घाडगे यांच्यावर सामूहिक हल्ला करत धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली.
प्रतिमा मथळा - तुषार मधुकर घाडगे
तीन वर्षांपूर्वी सत्र न्यायालयाने या प्रकरणातल्या सर्व बारा आरोपींना सक्षम पुरावे नसल्याने निर्दोष सोडून दिलं.
3. आंबेडकरांवरील गाण्याची रिंगटोन ठेवली म्हणून हत्या?
वय वर्ष जेमतेम 24 असलेल्या सागर शेजवळने आपल्या फोनवर आंबेडकरांवरील गाण्याची रिंगटोन ठेवली होती. 2015 साली मे महिन्यात सागर एका लग्नाला शिर्डीला गेला होता. एका बियर शॉपमध्ये असताना त्याचा फोन वाजला. त्याची फोनची रिंगटोन होती, "तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला."
आधीच दारूच्या नशेत असलेल्या काही लोकांनी सागरला रिंगटोन बदलायला सांगितली. पण सागरने त्याला नकार दिला. जातीय अहंकारात असलेल्या काही जणांनी सागरला जबरदस्त मारहाण केली. त्यात सागर आपल्या प्राणाला मुकला.
प्रतिमा मथळा - सागर शेजवळची आई आणि बहीण
सागरच्या हत्येनंतर काही संशयितांना अटक झाली. आता अटक केलेल्यांची जामिनावर सुटका झाली आहे. अजूनही अहमदनगर सेशन कोर्टात खटला सुरू आहे.
4. पारधी वस्ती उद्ध्वस्त!
मराठवाड्यातल्या बीडमध्ये गेवराईत 17 पारधी कुटुंबांची वस्ती होती. जवळच्या गावातील सवर्णांनी 2016च्या डिसेंबरमध्ये ही वस्ती उद्ध्वस्त केल्याचा आरोप आहे. या घटनेची तक्रार करायला गेलेले असताना पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही, असं पीडित कुटुंबांचं म्हणणं आहे.
प्रतिमा मथळा - गेवराईमधील पारधी वस्ती
'गुन्हेगार' म्हणून शिक्का बसल्याने पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही, अशा आशयाचं पत्र बीडच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांकडेही देण्यात आलं.
5. नितीन आगेच्या हत्येतील आरोपी सुटले
अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील खर्डा गावात राहणाऱ्या नितीन आगेची हत्या झाली ती संशयावरून.
नितीन बारावीत शिकत होता. एका सवर्ण मुलीशी बोलल्याचा संशयाने तिच्या भावाने आपल्या मित्रासंह नितीनला मरेस्तोवर मारहाण केल्याचा आरोप आहे.
प्रतिमा मथळा - नितीन आगेचे वडील आणि आई
दिवसाढवळ्या झालेल्या या अमानुष हत्येचे जबाबही प्रत्यक्षदर्शींकडून पोलिसांनी नोंदवून घेतले. कोर्टात केस उभी राहिली खरी पण 28 एप्रिल 2014 रोजी घडलेल्या या घटनेतील 13 आरोपी 2017 साली निर्दोष सुटले.
6. प्रेमसंबंधाच्या संशयातून रोहन काकडेची हत्या
साताऱ्यातल्या फलटणमध्ये 19 वर्षांच्या रोहन काकडेची हत्या झाली. मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून रोहनचा वाढदिवसाच्या आदल्या दिवशी खून झाला. त्याच्या हत्येच्या कटात पाच जण संशयित आहेत.
प्रतिमा मथळा - रोहन काकडेची आई त्याच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी म्हणून झुंज देतेय.
हत्येचा आरोप असलेलं सवर्ण कुटुंब आणि काकडे कुटुंब यांचे आधी संबंध मैत्रीचे होते. एका आरोपीने हत्या कशी झाली आणि कोणी केली, याचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. अजून आरोप सिद्ध झालेला नाही.
रोहनची आई त्याच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी म्हणून कोर्टात झुंज देत आहे.
7. बढती मिळाली पण जीव गेला!
संजय दणाणे साताऱ्यातील शाळेत नोकरीला होते. 10 वर्षं विनावेतन काम केल्यानंतर त्यांना याच शाळेत शिपायाची नोकरी मिळाली. तसंच पगारही मिळायला सुरुवात झाली.
त्यानंतर बढतीचा पाठपुरावा करण्यासाठी संजय यांनी सोलापूर, पुणे, मुंबई आणि दिल्लीपर्यंत संस्थेच्या वरिष्ठांना पत्रं लिहिली. त्यानंतर त्यांना लॅब असिस्टंट म्हणून बढती मिळालीही.
पण त्यानंतर त्यांची गावातच हत्या झाली.
प्रतिमा मथळा - संजय दणाणे यांचे वडील
या प्रकरणात शाळेतल्या पदाधिकाऱ्यांसह 18 जणांवर गुन्हा नोंदवला गेला, पण हे सर्व जण जामिनावर बाहेर आहेत. संजय यांच्या वडिलांना अजूनही आरोपींना शिक्षा होईल, अशी आशा आहे.
सुप्रीम कोर्टानं दिलेल्या नव्या निर्णयानुसार अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास आरोपीला लगेचच अटक करता येणार नाही. तसंच तपास करून पुढील कारवाई करता येईल असं कोर्टानं म्हटलं. या पार्श्वभूमीवर दलित अत्याचाराच्या घटनांकडे आणि त्यावरील कारवाईकडे कटाक्ष टाकणं गरजेचं आहे.
(या फोटोफीचर मतं लेखकाची वैयक्तिक आहेत.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा