तुषार कुलकर्णी
बीबीसी मराठी
11 एप्रिल 2018
"आपल्या स्वार्थासाठी नेते मंडळी वाट्टेल ते करायला तयार असतात. पण महिलांना त्यांचे हक्क मिळवून देणारं हिंदू कोड बिल मंजूर होत नाही म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मला पूजनीय वाटतात," असं सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल सांगतात.
डॉ. आंबेडकरांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन दारूबंदीसाठी झटणाऱ्या सत्यभामा सांगतात, "आज माणूस म्हणून जगण्याचा जो हक्क मिळाला आहे त्याचं श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच द्यावं लागेल. दहावीत असताना त्यांचा आम्हाला धडा होता. त्यामध्ये त्यांनी 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असा संदेश दिला होता. पण या गोष्टीचा अर्थ कळण्यासाठी बराच काळ जावा लागला. जेव्हा मी शिक्षण घेतलं तेव्हा मला 'वाचाल तर वाचाल' या वाक्याचा अर्थ कळला."
"आज एक महिला म्हणून मला समाजात जगताना, माणूस म्हणून वावरताना जे हक्क मिळाले आहेत ही बाबासाहेबांचीच देणगी आहे, असं मला वाटतं. आंबेडकरी चळवळीत काम करताना अनेक संकटं आलं पण त्यांच्या विचारांची शिदोरी माझ्यासोबत होती म्हणूनच मी त्या संकटांवर मात करू शकले," असं सत्यभामा सांगतात.
गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यात दारूबंदींची आणि महिला हक्कांची चळवळ चालवणाऱ्या कार्यकर्त्या अशी सत्यभामा यांची ओळख आहे. गेल्या 14-15 वर्षांपासून त्या दलित, महिला आणि वंचितांच्या प्रश्नावर काम करत आहेत.
"शोषितांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणं, हेच माझं ध्येय आहे," असं त्या सांगतात. "आंबेडकरांनी सांगितलेलं शिक्षणांचं महत्त्व माझ्या मनावर लहान वयातच उमटलं होतं. आधी ते फक्त दलितोद्धारक आहेत, असं वाटायचं. पण जसजसं त्यांचं कार्य आणखी कळत गेल, तसतसं त्यांचा मोठेपणा मला जाणवू लागला," असं त्या सांगतात.
'अडाणी राहिल्यामुळं हालअपेष्टा होतात'
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील सादोळा इथे जन्मलेल्या सत्यभामांचे वडील मुंबईला मजुरीला गेले आणि तिथेच त्यांनी दुसरं लग्न केलं. पाच मुलांची जबाबदारी त्यांच्या आईवर आणि आजीवर पडली. अतिशय कष्टात आजी आणि आईंनी त्यांना वाढवलं आणि शिक्षण दिलं.
"अडाणी राहिल्यामुळं समाजात ज्या हालअपेष्टा भोगाव्या लागतात त्या त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळं आपल्या नाती अडाणी राहता कामा नये, असं माझ्या आजीला वाटत होतं," सत्यभामा सांगतात.
"जमेल तसं शिक्षण घेत मी दहावीत पोहोचले. पण त्याच वेळी माझ्यावर आणि बहिणीवर चोरीचा खोटा आरोप लावण्यात आला. त्यामुळं काही दिवस मला तुरुंगात राहावं लागलं. तुरुंगातून बाहेर येण्यासाठी मानवी हक्क अभियानाचे अॅड. एकनाथ आव्हाड यांनी मला मदत केली. त्यांच्यामुळेच मला बाबासाहेबांच्या कार्याची ओळख झाली आणि माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली."
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना समान हक्क मिळावेत म्हणून लढा दिला. आज 21व्या शतकात हेच आंबेडकर जगभरातल्या विविध समान हक्क चळवळीतल्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहेत. महिलांपासून समलैंगिकांपर्यंत आणि अफ्रिकेपासून युरोपापर्यंत ते हजारो तरुण-तरुणींनाजगण्याची उमेद आणि संघर्षासाठी बळ देत आहेत. अशाच लढवय्यांच्या या कहाण्या सांगणारी बीबीसीची सीरिज #आंबेडकरआणिमी 14 एप्रिलच्या आंबेडकर जन्मदिवसाच्या निमित्ताने...
एकनाथ आव्हाड यांची संस्था गेल्या चार दशकांपासून मानवी हक्कांसाठी लढत आहेत. या संस्थेमार्फत, मराठवाड्यातल्या दलितांना गायरान जमिनी मिळवून देणं, पोतराज समाजाचे प्रश्न मांडणं आणि देवदासी प्रथेविरुद्ध लढा देणं, ही कामं करण्यात आली आहेत.
तुम्हाला समाजकार्यात का यावं वाटलं, असं विचारल्यावर त्या सांगतात, "माझ्या आयुष्यावर आव्हाडांचा खूप प्रभाव राहिला आहे. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे मी दहावीनंतर माजलगावला वसतीगृहात राहून शिक्षण घेतलं. पदवी घेत असतानाच मी त्यांच्यासोबत कार्यकर्ती म्हणून काम करू लागले होते. पदवी पूर्ण करून लग्न केलं. लग्नानंतर मी Master in Social Work (MSW) पूर्ण केलं. मला खरं तर PSI व्हायचं होतं, पण MSW करताना लोकांशी जवळून संबंध आला आणि मी समाजकार्याकडे वळले."
कौटुंबिक हिंसाचाराचं मूळ शोधण्याचा प्रयत्न
"कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांना मदत करण्याचं काम मी करत होते. ते करताना या प्रश्नांचं गांभीर्य मला जाणवलं. कुठलाही प्रश्न असेल तर त्याच्या मुळाशी जाऊन त्याचं उच्चाटन करायचं, हा डॉ. आंबेडकरांचा विचार मला पटतो," त्या सांगतात.
"कौटुंबिक हिंसाचाराचा मी त्याच पद्धतीनं अभ्यास करू लागले. त्यातून मला असा जाणवलं की बहुतांश केसेस या दारूमुळेच होतात. नवरा दारू पिऊन घरी येतो आणि बायकोला मारहाण करतो, हे चित्र सर्सास दिसत होतं. म्हणून मी जिल्ह्यात दारूबंदी कशी करता येईल याचा विचार करू लागले. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चा अभ्यास करून मी त्याची जिल्ह्यात कशी कठोरपणे अंमलबजावणी करता येण्यासाठी काय करता येईल हे पाहिलं आणि पावलं उचलली," असं त्या सांगतात.
प्रत्येक पावलाला मिळाली आंबेडकरांच्या विचारांची साथ
15 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेताना डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांना 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या. त्यापैकी 17व्या क्रमांकाची प्रतिज्ञा असं सांगते - 'मी कधीही मद्यपान किंवा अमलीपदार्थांचं सेवन करणार नाही.'
"जेव्हा आम्ही लोकांना सांगतो की मद्यपान करू नका तेव्हा आम्ही त्यांना बाबासाहेबांनी दिलेल्या प्रतिज्ञेची आठवण करून देतो. राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येही मद्यसेवनाच्या बंदीबाबत सांगण्यात आलं आहे. या आधारावरच आम्ही लोकांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो. आंबेडकर जयंतीला अनेक जण मद्यपान करतात. त्यांना आम्ही सांगतो, जयंतीला मद्यपान करणं म्हणजे त्यांच्या शिकवणीचा अपमान करण्यासारखं आहे," असं त्या पोटतिडकीनं सांगतात.
'जेव्हा महिलांनीच माझ्यावर हल्ला केला'
दारूबंदीसाठी झटताना त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, पण त्याबरोबरच त्यांना अनेक अडचणींनाही तोंड द्यावं लागलं.
"31 मार्च 2017 रोजी आंदोलनादरम्यान काही पुरुषांच्या सांगण्यावरून महिलांनी माझ्यावर हल्ला केला होता. माझे केस त्यांनी अक्षरशः उपटले. त्यानंतर ते केस येण्यासाठी कित्येक वर्षं मला वाट पाहावी लागली. त्या महिला असून देखील त्यांनी माझी साडी फाडली. या प्रसंगातून सावरण्यासाठी मला अनेक दिवस लागले पण मी पुन्हा उठून लढण्याचा निर्धार केला," त्या सांगतात.
प्रतिमा मथळा - सत्यभामा सौंदरमल डावीकडून पहिल्या.
"मी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ती आहे, कुणीही माझं काही बिघडवू शकणार नाही, असा आत्मविश्वास मला आला. माझ्यावर बलात्कार झाला किंवा माझा जीव गेला तरी मी ही चळवळ सोडणार नाही," असं त्या सांगतात.
"सुरुवातीपासूनच काही लोकांचा या कार्याला विरोध होता... पुढे देखील होईल. पण मी हताश होणार नाही."
त्यांच्या प्रयत्नांमुळे बीड जिल्ह्यातील किट्टी आडगाव, वारोळा, कवडगाव घोडा या गावांमध्ये दारूबंदी झाली आहे. दारूबंदीसोबतच कौटुंबिक समुपदेशन, पालावरच्या मुलांचा सांभाळ करणं, अनाथ मुलांना सांभाळणं ही कामं देखील त्या करतात. त्यांना समाजकार्य करता येईल म्हणून त्यांचे पती नारायण डावरे यांनी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. दामिनी दारूबंदी अभियान या सत्यभामांच्या संस्थेमध्ये स्वयंसेवक म्हणून देखील ते काम करतात.
"मी काम करण्यासाठी बाहेर गेले असता ते आमच्या दोन्ही मुलींकडे लक्ष देतात," असं त्या सांगतात.
आधुनिक भारताचे शिल्पकार आंबेडकर
सत्यभामा यांच्यानुसार डॉ. आंबेडकर हे केवळ घटनेचेच नव्हे तर आधुनिक भारताचेही शिल्पकार आहेत. "त्यांनी सांगितलेली तत्त्वं, त्यांची राजकारणाची पद्धत आणि त्यांची अर्थनीती आपण अवलंबली तर त्यांच्या स्वप्नातला भारत नक्कीच साकार होईल, असा मला विश्वास वाटतो."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा