कोणताही कायदा किंवा राज्यघटना तयार करताना त्या कायद्याच्या किंवा राज्यघटनेच्या प्रारंभी एक प्रस्तावना जोडण्याची प्रथा सर्वसाधारणपणे पाळली जात असल्याचे पहावयास मिळते. लिखित राज्यघटनेला तर अशी प्रस्तावना जोडलेलीच असते. या प्रस्तावनेमध्ये त्या राज्यघटनेच्या उद्दिष्टांसंबंधी चर्चा केलेली असते. राज्यघटनेला जोडण्यात आलेल्या अशा प्रस्तावनेलाच घटनेचा "सरनामा ( Preamble ) असे म्हटले जाते. सारनाम्याला "उद्देशपत्रिका" असेही संबोधले जाते.
भारतीय राज्यघटनेला देखील या प्रकारचा सरनामा जोडण्यात आला आहे. घटनेच्या सारनाम्यात त्या घटनेच्या मूलभूत तत्वांची व उद्दिष्टांची माहिती देण्यात आलेली असते ; म्हणूनच असे म्हटले जाते की, सारनाम्यामुळे त्या घटनेच्या तत्त्वज्ञानावर तसेच घटनाकारांचे हेतू व उद्दिष्टे यांवर प्रकाश टाकण्याचे कार्य केले जाते. भारतीय राज्यघटनेच्या सारनाम्याला तर हे विधान पूर्णपणे लागू पडते. आपल्या घटनाकारांनी सारनाम्यात अतिशय मोजक्या व अचूक परिणामकारक शब्दांत राज्यघटनेची उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत. घटनाकारांच्या विचारांचे प्रतिबिंब घटनेच्या सारनाम्यात पडले आहेत, असेही आपणास म्हणता येईल. आपल्या घटनाकारांना या देशात कोणत्या प्रकारची समाजव्यवस्था व राज्यव्यवस्था प्रस्थापित होणे अपेक्षित होते, हे घटनेच्या सारनाम्यावरून स्पष्ट होते. थोडक्यात, भारतीय घटनेचे संपूर्ण तत्वज्ञानच सारांशरूपाने सारनाम्यात उतरले आहे.
भारतीय राज्यघटनेला जोडण्यात आलेला सारनामा किंवा उद्देशपत्रिका पुढीलप्रमाणे आहे.
"आम्ही भारतीय जनता भारताचे सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक निर्माण करण्याचे आणि भारतातील सर्व नागरिकांना -
न्याय : सामाजिक, आर्थिक आणि राजकीय.
स्वातंत्र्य : विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, धर्म व उपासना यांचे.
समता : दर्जा आणि संधी यासंबंधीची आणि
बंधुता : व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राचे ऐक्य व एकात्मता यांची हमी देणारी.
यासंबंधीची शाश्वती देण्याचे आमच्या घटना समितीत या नोव्हेंबर, १९४९ च्या सव्वीसाव्या दिवशी प्रतिज्ञापूर्वक ठरवीत आहोत आणि ही राज्यघटना मान्य करीत आहोत आणि तत्संबंधी कायदा करून आम्ही तिचा स्वीकार करीत आहोत.
WE THE PEOPLE OF INDIA having solemnly resolved to constitute India into a SOVEREIGN, SOCIALIST, SECULAR DEMOCRATIC REPUBLIC and to secure to all its citizens.
JUSTICE : social, economic and political ;
LIBERTY : of thoughts, expression, belief, faith and worship ;
EQUALITY : of status and of opportunity and to promote among them all.
FRATERNITY : assuring the dignity of the individual and the unity integrity and the unity and integrity of the Nation ;
IN OUR CONSTITUENT ASSEMBLY, this twenty-sixth day of November, 1949, do HEREBY ADOPT, ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION.
बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने केलेले बदल :
इ. स. १९७६ च्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती कायद्याने राजघटनेच्या सारनाम्यामध्ये थोडासा बदल केला असून त्यात भर टाकली आहे. सारनाम्यामध्ये करण्यात आलेला हा बदल पुढीलप्रमाणे आहे -
सारनाम्यातील मूळ शब्दयोजना 'सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक' ( Sovereign Democratic, Republic ) अशी होती. त्याऐवजी 'सार्वभौम, समाजवादी,धर्मातीत, लोकशाही प्रजासत्ताक' असा बदल करण्यात आला ; म्हणजे समाजवादी व धर्मातीत या दोन शब्दांची ( Socialist, Secular ) भर टाकण्यात आली.
आणखी एका ठिकाणी 'राष्ट्राचे ऐक्य' ( The unity of the Nation ) याऐवजी 'राष्ट्राचे ऐक्य व एकात्मता' ( The unity and integrity of the Nation ) अशी शब्दयोजना करण्यात आली.
संदर्भ : भारतीय राज्यघटना / पान नं. ३०१, PSI ASSTT मुख्य परीक्षा पेपर दुसरा, के सागर पब्लिकेशन, प्रथम आवृत्ती जुलै २०१२.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा