पहिल्यांदा जेव्हा नागराज मंजुळे यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्या घरी आणला, तेव्हा नेमकं काय घडलं? याबाबत आपण जाणून घेऊयात...

- आयेशा सय्यद
- Publish Date - 8:30 am, Sun, 13 March 22
झुंडमधला हा फोटो पाहून अनेकांना नागराजच्या मनातील बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थान काय आहे?, असा प्रश्न पडला. नागराज यांनी एका मुलाखतीत याचं उत्तर दिलं होतं. “मला किंवा माझ्या घरातल्या माणसांना बाबसाहेब आंबेडकर माहित नव्हते. दहावी झाल्यानंतर मला आंबेडकर कळू लागले. बाळू बनसोडे नावाचा माझा मित्र आहे. त्याच्याकडून मला बाबासाहेब समजू लागले. त्याने मला सांगितलं की बाबासाहेबांची हालाकीची परिस्थिती असताना ते कसे शिकले, ते इतरांनाही कसं शिकण्यासाठी प्रोत्साहित करायचे वगैरे…”, असं नागराज यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं. “हळूहळू मला बाबासाहेब आणि माझ्यातलं नातं स्पष्ट व्हायला लागलं. मला वाटायचं की मी बाबासाहेब आहे…”, असंही नागराज यांनी या मुलाखतीत सांगितलं.
नागराजने बाबासाहेबांचा फोटो घरी आणला
नागराज यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घरात लावल्याचाही किस्सा या मुलाखतीत सांगितला. “बारावीत असताना मी बाबासाहेबांचा फोटो घरात लावायचं ठरवलं. देवाच्या फ्रेममधला देवाचा फोटो काढला आणि त्या फ्रेममध्ये बाबासाहेबांचा फोटो लावला. हा फोटो लावल्यामुळे माझ्या वडिलांसोबत माझं 15-20 दिवसांपेक्षा जास्त दिवस भांडण झालं”, असं नागराज यांनी सांगितलं.
“वडिल म्हणायचे महाराचा फोटो आपल्या घरात कशाला लावलास? पण मग मी माझ्या वडिलांशी खूप भांडलो. मी त्यांना म्हणालो की तुम्ही जर बाबासाहेबांचा फोटो काढला तर मी देवाचे सगळे फोटो फेकून देईल… पण मग मी पुस्तक वाचून बाबासाहेबांचे विचार वडिलांना सांगितले. बाबासाहेबांनी या या गोष्टी केल्या, असं सांगितलं. त्यांच्यामुळे झालेले बदल सांगितले. त्यांच्यामुळे शाळेतली फी माफ होते. आधी तुम्ही गाडग्यात जेवायचा आता तसं होत नाही. ही सगळी बाबासाहेबांची कृपा आहे. पण तरीही ते म्हणायचे. सगळं खरं आहे, पण जात जात असते. लोकांना आपलं घर महाराचं आहे असं वाटेल, असं वडील सांगायचे. मग मी त्यांना समजावलं की कुणाला काहीही वाटू द्या… आपल्या घरात बाबासाहेबांचा फोटो हवाच! असं करत-करत मी त्यांना समजवलं आणि मग मी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार समजून घेतले”, असं नागराज यांनी या मुलाखतीत सांगितलं. सध्या नागराज यांच्या मनात बाबासाहेबांचं काय स्थान आहे हे झुंडमधील एका सीनने दाखवून दिलं. ज्याला प्रेक्षकांनीही चांगलीच दाद दिली.
Link : https://www.tv9marathi.com/entertainment/marathi-cinema/director-nagraj-manjule-babasaheb-ambedkar-photo-brought-home-his-fathers-opposed-660366.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा