शनिवार, १० जून, २०२३

प्रजासत्ताक दिन : ' ...म्हणून मी माझ्या मुलाचं, घराचं, दुकानाचं नाव 'संविधान' ठेवलं'

 राहुल गायकवाड

  • बीबीसी मराठीसाठी
राजकुमार म्हस्के

फोटो स्रोत,RAJKUMAR MHASKE

फोटो कॅप्शन,

राजकुमार म्हस्के यांनी आपल्या मुलाचं नावही संविधान ठेवलं आहे.

"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला दिलं, त्या संविधानाचा प्रचार होण्यासाठी मी माझ्या मुलाचं नाव संविधान ठेवलं," पुण्यातल्या जनता वसाहत या भागात राहणारे राजकुमार म्हस्के सांगत होते.

राजकुमार म्हस्के यांचं संविधानावर नितांत प्रेम आहे. आज मी जो काही आहे तो संविधानामुळे आहे, असं ते सांगतात. त्यामुळे संविधानाचं महत्त्व जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचावं यासाठी त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावाबरोबरच त्यांच्या घराचं, दुकानाचं, रिक्षाचं आणि टेम्पोच नाव सुद्धा संविधान ठेवलं आहे.

राजकुमार गेल्या अनेक वर्षांपासून जनता वसाहत या भागात राहतात. जनता वसाहत हा दाटीवाटीचा आणि झोपडपट्टीचा भाग. पर्वती पायथ्याला असणाऱ्या या भागात अनेक चिंचोळ्या गल्ल्या आहेत.

या भागात राजकुमार यांचं घर 'संविधान' या नावामुळे लक्ष वेधून घेतं. सगळ्याच गोष्टींना 'संविधान' नाव दिल्यामुळे कोणालाही पत्ता विचारला तरी ते लगेच सांगतात.

राजकुमार मूळचे सोलापूरचे. त्यांचे आईवडील वीटभट्टीवर काम करायचे त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही. आपल्याला शिकता आलं नाही पण आपल्या मुलांना शिक्षण मिळायला हवं या विचाराने ते त्यांच्या मुलांना शिकवतायेत.

त्यांची मुलं पुण्यातल्या नावाजलेल्या शाळेत आणि महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतायेत.

राजकुमार म्हस्के

फोटो स्रोत,RAJKUMAR MHASAKE

फोटो कॅप्शन,

राजकुमार म्हस्के

राजकुमार यांनी सांगितलं, "संविधानाच्या प्रचारासाठी मुलाचं नाव संविधान ठेवलं. नागपूरच्या दीक्षाभूमीवरून प्रेरणा घेत एका मुलीचं नाव 'दीक्षा', तर दुसरीचे नाव 'भूमी' ठेवलं. आज मी जो काही आहे तो बाबासाहेबांमुळे आहे. आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबासाहेबांनी दिला आहे.

आई वडिलांनी जरी आम्हाला घडवलं असलं तरी या जिंदगीला आंबेडकरांनी सोन्याने मढवलं आहे. आंबेडकरांचे विचार पोहचवण्यासाठी घराला, दुकानाला, टेम्पो, रिक्षा, टू व्हीलर या सगळ्याला 'संविधान' नाव दिलंय."

राजकुमार 2005 साली पुण्यात आले. सुरुवातीला त्यांनी भंगारचा व्यवसाय केला. त्यातून पुढे दुकान आणि रिक्षा सुरू केली.

आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांच्या गाण्यातून आणि साहेबराव यरेकर यांच्या प्रबोधनातून संविधानाची माहिती त्यांना मिळाली. शिक्षण झालं नसल्याने त्यांना पुस्तकं वाचता आली नाहीत, पण मुलांना ती वाचता यावीत म्हणून ते त्यांच्या मुलांना पुस्तकं आणून देतात.

राजकुमार म्हस्के

फोटो स्रोत,NITIN NAGARKAR/BBC

राजकुमार यांचं शिक्षण झालं नसलं तरी आंबेडकर चळवळीत काम करत असल्याने कुठली पुस्तकं मुलांना वाचायला द्यायला हवीत हे त्यांना माहिती आहे. अनेक प्रबोधनाची पुस्तकं ते मुलांना आणून देतात.

आपल्याला परिस्थितीमुळे शिकता आलं नाही याची त्यांना खंत वाटते. "मी शिकलो असतो तर अजून काहीतरी चांगल करता आल असतं. आम्हाला मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं."

"संविधानामुळे मुलांना शिक्षण देता आलं. आम्हाला एक चांगलं आयुष्य जगता येतंय. हे दिवस बाबासाहेब आणि संविधानामुळे आहेत, मग त्यांना विसरून कसं चालेल. बाबासाहेबांनी सुरू केलेला रथ आम्हाला पुढे घेऊन जायचाय," राजकुमार सांगत होते.

राजकुमार म्हस्के

फोटो स्रोत,NITIN NAGARKAR/BBC

संविधानामध्ये जरी समता, बंधुता ही तत्त्वं असली तरी अजूनही खेडोपाड्यात जातीयता आहे असं राजकुमार यांना वाटतं. तिथे सुद्धा संविधानाचा प्रचार व्हावा, असं ते सांगतात.

राजकुमार यांच्या दुकानात येणारे, रिक्षात बसणारे लोक त्यांना 'संविधान' या नावाबद्दल विचारतात तेव्हा हे नाव का दिलं ते आवर्जून सांगतात.

संविधान दिनाला प्रबोधनाचा कार्यक्रम ते आवर्जून आयोजित करतात. त्या दिवशी ते मुलांना पुस्तकं देखील आणून देतात. जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत संविधानाचा प्रचार करत राहणार हा निश्चय देखील ते व्यक्त करतात.

Link : https://www.bbc.com/marathi/india-60137527

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

व्हीडिओ कॅप्शन,सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा