सम्राट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सम्राट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

समाज, संघटनेसाठी वैयक्तिक अहंकाराचा त्याग आवश्यक

     या पृथ्वीवरील मनुष्य हा विचार करणारा एकमेव समाजशील सजीव आहे. मनुष्य आपल्या गरजा समूहात राहूनच पूर्ण करतो. आपले सुख दुःख , आपल्या समस्या आपल्या समाजबांधवांना सांगून त्याची सोडवणूक करून घेतो. भारतामध्ये धर्मपरंपरेने मनुष्याचे जातीनुसार समूह करून ठेवले आहेत. ज्या समूहामध्ये तो जन्मला त्याच समूहामध्ये राहून त्याने मरावे. ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या जाचक अटींमुळे मनुष्याला आपले जीवन त्याच्या जातीच्या चौकटीत राहून जगावे लागते असे. त्यामुळे मागासवर्गीय जाती जमातींना आपले जीवन जगणे अवघड जात होते. ह्या ब्राह्मणवादी व्यवस्थेमध्ये तत्कालीन महार समूहाची अवस्था तर अतिशय बिकट होती. एवढी बिकट की तिचे वर्णन शब्दात करता येणार नाही. अशा कल्पनातीत अवस्थेत हा मागासवर्गीय समाज अतिशय हिनतेचे जीवन जगत जिवंत राहत होता. धर्मग्रंथांना आणि वरणवर्चस्ववादी व्यवस्थेला विरोध करण्याची त्याकाळी कोणाची हिंमत नव्हती. अतिशय स्वार्थीपणे स्वतःच्या हितासाठी कोट्यवधी मागासवर्गीयांवर अनन्वित अत्याचार करून हे ब्राह्मणवादी लोक या देशातील सामाजिक राजकीय व्यवस्था आपल्या मर्जीनुसार चालवीत होते. परंतु अशा बंदिस्त जातीय चौकटीला तोडून ह्या कोट्यवधी जनतेला बंधनमुक्त करण्याचे काम युगपुरुष, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. ज्यांना बोलण्याची मुभा नव्हती, त्यांना उच्च शिक्षण देऊन बोलके केले. जातीव्यवस्थेची बंधने स्वीकारून निमूटपणे पशुवत जीवन जगणारा हा कोट्यवधी अस्पृश्य समाज आम्हालाही ह्या पुढारलेल्या समाजप्रमाणे चांगले जीवन जगायचे आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणरूपी पाजलेल्या अमृताच्या बळावर बोलू लागला. डॉ. बाबासाहेबांनी ह्या अस्पृश्य समाजामध्ये एवढी  प्रचंड ऊर्जा भरली की , हा समाज संघटित होऊन चांगले प्राप्त करण्यासाठी डॉ. बाबसाहेबांच्या प्रत्येक आंदोलनात छाती पुढे करून सक्रियपणे सहभागी होऊ लागला. डॉ. बाबासाहेबांच्या काळात समाज अशिक्षित होता. परंतु त्यांची श्रद्धा डॉ. बाबासाहेबांच्या विचारावर, चळवळीवर होती. आपली पशुवत अवस्था बदलण्यासाठी प्रत्येकजण डॉ. बाबासाहेबांच्या हाकेला ओ देऊन मैदानात उतरत होता. आमच्या समाजबांधवांच्या प्रचंड निष्ठेमुळे डॉ. बाबासाहेबानी योजिलेली प्रत्येक आंदोलने यशस्वी होऊन आज आम्ही माणूसपणाचे सर्व सुखसोई जीवन जगत आहोत.
     शिक्षणाशिवाय मनुष्याची प्रगती होणार नाही, त्याला स्वत्वाची जाणीव होणार नाही. म्हणून डॉ. बाबासाहेबांनी आपल्या समाजाला प्रचंड संघर्षातून शिक्षणाची दारे उघडी करून दिली. उच्च शिक्षण घेऊन येथील धार्मिक धूर्त जातीयवादी, विषमतावादी व्यवस्थेचे डावपेच ओळखून माझा उच्च शिक्षित समाज आपल्या सर्व समाजबांधवांना भाविष्यात आणखी नियोजनरीत्या प्रचंड प्रमाणात संघटित करेल आणि ह्या संघटनेच्या जोरावर आपले मानवी हक्क अबाधित ठेवील. त्यामुळे माझ्या समाजावर कोणीही अन्याय करणार नाहीं आणि ह्या देशामध्ये कोणत्याही प्रकारची विषमता राहणार नाही, कारण हा शिकलेला वर्ग आपल्या आणि आपल्या समाजबांधवांच्या मानवी हक्कांसाठी सदैव जागृत राहील. समाजाला खडा पहारा देईल. कोठेही अन्याय अत्याचार होत असतील तेव्हा  हा शिकलेला वर्ग आपल्या समाज संघटनेच्या जोरावर ते विषमतेचे प्रयत्न हाणून पाडील असा विश्वास डॉ. बाबासाहेबांना या शिकलेल्या वर्गाकडून होता. शिक्षित वर्गाची प्रचंड मोठी फळी आपल्या हजारो वर्षे पशुवत जीवन जगणाऱ्या समाज बांधवांचे न्याय हक्क अबाधित ठेवण्यासाठी मानवतेचे जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी तयार करून ठेवली आहे. मतदानाच्या अधिकारामुळे येथील व्यवस्थेमध्ये हवे ते बदल करण्याचे सामर्थ्य येणाऱ्या प्रत्येक पिढीमधे निर्माण केले होते. म्हणूनच महाकवी वामनदादा म्हणतात, मुके केले बोलके, अंधा दिली दृष्टी, मुडद्याशी जागविला चकित झाली सृष्टी.' ही सर्व सृष्टी, हे विश्व डॉ. बाबासाहेबांनी येथील बंदिस्त असलेल्या मानवांना मुक्त केल्यामुळे चकित झाली आहे.
     ह्या उच्च शिक्षणाच्या सामाजिक परिणामांची दुसरी बाजू पाहिली तर डॉ. बाबासाहेबांच्या काळात आणि नंतरच्या २०-२५ वर्षांच्या काळात आंबेडकरी समाजामध्ये जो आपुलकीचा संवाद होता, आपल्या समाज-बांधवांवारील अन्याय्य दूर करण्याची, आपल्या माय माऊलीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर त्याची कायदेशीर वाट लावण्याची जी चीड होती, ती अलीकडे राहिली नसल्याचे दिसून येते.  घरोघरी उच्च शिक्षित, पदवीधर निर्माण झाले आहेत, या उच्च शिक्षणाचा अहंपणासुद्धा वाढल्याचे दिसून येत आहे. मी काय त्याच्यापेक्षा कमी आहे काय ? मी त्याचे काय म्हणून ऐकू ? त्याने माझे ऐकावे हा अहंकार आज आपल्या शिक्षित बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे, त्यामुळे आपले संघटन न होण्यास, आमच्या अन्याय, अत्याचारामध्ये, वाढ होण्यास कारणीभूत ठरत आहे. ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत आपले शिकलेले समाज बांधव एकमेकांशी आपुलकीची भावना, बंधू भावाची हितगुज करताना दिसून येईना झालेत. कोणताही सामाजिक कार्यक्रम असो, बौद्ध विहारातील कार्यक्रम असो, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकारांची जयंती असो, त्याठिकाणी स्वयं प्रेरणेने हे शिकलेले समाजबांधव सहभागी होताना दिसून येईना. कार्यक्रमाच्या ठिकाणी शुकशुकाट आणि बाजूला रस्त्यावर , चौकात एकमेकांशी अवांतर विषयांवर समूहाने चर्चा करताना दिसून येत आहेत. आपल्या प्रश्नांविषयी गंभीरता दिसून येईना झाली आहे. प्रत्येक गावात, शहरातील प्रत्येक नगरात एकमेकांबद्दल तिरस्काराची भावना वाढीस लागत असल्याचे मोठ्ठया दुःखाने म्हणावे लागत आहे.
   उच्च शिक्षित समाज बांधवांना वाटत आहे की मी कोणत्याही कार्यक्रमात स्वतः हुन पुढे होऊ तर माझ्या पदवीचा, डिग्रीचा काय उपयोग ? तसेच शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचा-याना वाटत आहे की, मी एवढा मोठा  अधिकारी आहे, मी अमुक जिल्हा पातळीवरचा, राज्य पातळीवरचा, राष्ट्रीय पातळीवरचा पुढारी आहे. त्यामामुळे सर्व सामान्य लोकांमध्ये मला कसे मिसळत येईल ? माझ्या पदाचा अवमान होईल. म्हणून तो स्वतः ला समाजापासून चार हात दूर ठेवत आहे. त्यामुळे येथील वर्ण वर्चस्ववादी व्यवस्थेकडून आमच्या मूलभूत समस्यांची सोडवणूक करून घेण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. एकतर उच्च शिक्षत संघटनेचे नेतृत्व स्वीकारायला तयार नाहीत आणि जो नेतृत्व करत आहे तो उच्च शिक्षित नसल्यामुळे या व्यवस्थेचे धूर्त डावपेच ओळखण्यात आणि संघटनेची रणनीती तयार करण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या नंतर आपल्या समस्या वाढून प्रत्येक समाज बांधव स्वतः ला असुरक्षित, पोरका समजत आहे. आपल्या सामाजिक , राजकीय, शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी समाजाला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी  पदवीधर, अधिकारी, कर्मचारी वर्गाने आपले योगदान देने गरजेचे असताना समाजातील हे क्रियाशील घटक पदाच्या, पदवीच्या, अहंकारापायी समाजाला निष्क्रिय करत आहेत. आपल्या सर्व सामान्य माणसांना आपली परिस्थिती, आपल्या समाजातील शिकले सवरलेले, आपले समाज बांधव बदलतील अशी आशा आजही आहे. गावामध्ये तसेच शहरातही वावरणाऱ्या आपल्या शिक्षित बांधवांकडे , अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे, राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांकडे आपले सर्व सामान्य बांधव आशाळभूत नजरेने
पाहत आहेत.

भैय्यासाहेब गोडबोले
9011633874

संदर्भ - दैनिक सम्राट, शुक्रवार, दि. 25 ऑगस्ट 2017, पान नं. 4