राज असरोंडकर
आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते
16 एप्रिल 2018
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवशी नवयुग विशेषांकासाठी दिलेला हा संदेश पुरेसा बोलका आहे.
"आपल्या हिंदुस्थानात राजकीय पुढाऱ्याला अवतारी पुरुषाप्रमाणे मान दिला जातो. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हिंदुस्थानाबाहेर केवळ महापुरुषांच्याच जयंत्या साजऱ्या केल्या जातात. पण हिंदुस्थानात अवतारी पुरुष आणि राजकीय पुरुष या दोघांचेही जन्मदिवस पाळले जातात. हे असे असावे, ही दुःखाची गोष्ट आहे. व्यक्तिशः माझा वाढदिवस साजरा व्हावा, हे मला मुळीच आवडत नाही. मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे, मला विभूतीपूजा कशी आवडेल? विभूतीपूजा हा लोकशाहीचा विपर्यास आहे. पुढारी लायक असेल तर त्याबद्दल कौतुक, प्रेम, आदर या भावना बाळगायला हरकत नाही. तथापि, तेवढ्यानेच त्या पुढाऱ्याचे आणि त्याच्या अनुयायांचे समाधान व्हावयास हवे. पण पुढाऱ्याची देवाप्रमाणे पूजा करणे मला बिल्कुल मान्य नाही. त्यामुळे त्या पुढाऱ्याबरोबर त्याच्या भक्तांचाही अधःपात होतो."
या संदेशाच्या अनुषंगाने प्रत्येक आंबेडकरी कार्यकर्त्यानं त्याच्यातील आंबेडकरवादाचं मूल्यमापन करायला हरकत नाही.
इथे प्रत्येकाचा बाबासाहेब वेगळा आहे. तो ज्याच्या त्याच्या सोयीने आहे. बाबासाहेबांबद्दल अभिव्यक्त होण्याची जणू अहमहमिका लागली आहे. पण प्रत्यक्षात काय?
सरसेनापतीसारखा पुढारी, सभासद, मूलभूत योजना आणि शिस्त यांचा समावेश असलेली संघटना, ध्येय, धोरण आणि तत्त्वज्ञान, कार्यक्रम, राजकीय डावपेच आणि मुत्सद्देगिरी या बाबींच्या समावेशातून पक्ष बनतो. विशिष्ट ध्येयवादाने प्रेरित होऊन मतदारांनी केलेली संघटना म्हणजे पक्ष अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्याख्या केली होती.
बाबासाहेबांचा प्रयत्न
बाबासाहेबांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष काँग्रेसला पर्याय म्हणून निर्माण व्हायचा होता. देशातील छोट्या छोट्या पक्षाचं विलीनीकरण या एका पक्षात करून काँग्रेसला पर्याय अशी एकच संयुक्त आघाडी असावी, हा बाबासाहेबांचा प्रयत्न होता.
प्रतिमा मथळा - राजकीय पक्षाची बाबासाहेबांना अपेक्षित व्याप्तीच अजून आंबेडकरी नेतृत्वानं समजून घेतलेली नाही. ती समजून घ्यायचीही नाही.
आज रिपब्लिकन पक्षाचेच छोट्या छोट्या पक्षात तुकडे करून बाबासाहेबांचं स्वप्न पार धुळीला मिळवलं गेलं आहे. पण झाल्या घटनांतून धडा घेण्याऐवजी तेच तेच ऐक्याचं तुणतुण वाजवायचं काम सुरू आहे.
त्याचं कारण स्पष्ट आहे. राजकीय पक्षाची बाबासाहेबांना अपेक्षित व्याप्तीच अजून आंबेडकरी नेतृत्वानं समजून घेतलेली नाही. ती समजून घ्यायचीही नाही. आपापली दुकानं, टपऱ्या सांभाळून ठेवायच्या आहेत, त्यामुळेच की काय बौद्धांच्या पलीकडे समस्त भारतीयात जाण्याचा विचार तथाकथित आंबेडकरी नेतृत्व करीत नाही.
समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्त्वांवर आधारित पक्ष बाबासाहेबांना अपेक्षित होता. लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल रक्तविरहीत मार्गांनी घडवून आणणारी शासनपद्धती म्हणजे लोकशाही ही बाबासाहेबांची लोकशाहीची कल्पना. घटनात्मक नीतिमत्तेच्या पालनावर बाबासाहेबांचा भर होता. पण बाबासाहेबांच्या स्वप्नातील काँग्रेसला पर्याय होईल असा पक्ष देशात उभा राहिलाच नाही.
काँग्रेसला पर्याय मिळाला, पण तो पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, संवैधानिक लोकशाहीवादी विचारधारेला रुचणारा नाही. अर्थात, आजच्या नव आंबेडकरी विचारधारेतही बाबासाहेबांना अपेक्षित देशातील सर्व समाजघटकांना सामावून घेणारा व्यापक दृष्टिकोन नाही, हीच मोठी अडचण आहे.
परिवर्तनाच्या लढाईतील अडथळे
संयम, समन्वयाचा अभाव, ध्येयाची अनिश्चिती आणि वैचारिक गोंधळ या बाबी परिवर्तनाच्या लढाईतील अडथळे बनले आहेत. समाजकारण आणि राजकारण यांची गल्लत होते आहे. आपल्याला देशातील हा राजकीय बदल खटकत असेल, तर समर्थ राजकीय पर्याय देण्याचीही तयारी हवी. डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर आधारित चळवळच पर्याय ठरू शकते, पण तसं होण्यासाठी आवश्यक राजकीय लवचिकता किंवा मुत्सद्दीपणा ही चळवळ दाखवणार आहे का, हा खरा कळीचा प्रश्न आहे.
बाबासाहेबांच्या विचारांचे आपणच एकमेव प्रामाणिक पाईक आहोत आणि बाकी सगळे अविश्वासू आहेत, ही भावना चळवळीला मारक ठरते आहे.
एकतर लोक बाबासाहेबांनी 1956 पूर्वी जे काही लिहून बोलून ठेवलंय, त्याच्या पलीकडे जायला तयार नाही. स्वतःची मतं मांडायला लोक घाबरतात. मांडली आणि विरोध झाला की बाबासाहेबांचाच संदर्भ देऊन पाठिंबा देतात. विरोध करणारेही बाबासाहेबांचाच संदर्भ देऊन विरोध करत असतात. याचा अर्थ बाबासाहेबच बाबासाहेबांशी वाद घालत असतात!
"खरोखरच कोणाला जाती मोडायच्या असतील तर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करावा, हाच एक उपाय आहे. परंतु आपण कसलीही घाई न करता, हळूहळू आपले साध्य साधू. जुनी माणसे, ज्यांच्या हाडीमाशी हिंदू धर्म भिनून राहिला, अशांना हिंदू धर्म ताबडतोब सोडा, असं आपण म्हटलं तर त्यांना ते जमणार नाही आणि मीही त्यांना तसं काही सांगणार नाही. परंतु तरुणांच्या बद्दल मला दांडगा आत्मविश्वास आहे. योग्य त्या मार्गानं जाऊन आपला, समाजाचा व राष्ट्राचा उत्कर्ष ते खचित साधतील," असं स्वतः बाबासाहेबांनीच 26 मे 1951च्या 'जनता'च्या अंकात म्हटलेलं आहे.
बाबासाहेबांचा बदलाच्या प्रक्रियेवरचा हा विश्वास नीट समजून घेण्याची गरज आहे.
बाबासाहेबांनी धर्मांतरावेळी दिलेल्या 22 प्रतिज्ञा म्हणजे हिंदू धर्माच्या त्यागाची आणि बौद्ध धम्माच्या स्वीकाराची समांतर प्रक्रिया होती.
एका बाजूला जुन्या रूढी परंपरा त्यागत जायच्या आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूने जगण्याच्या नवा मार्ग स्वीकारत जायचा, पण देवादिकांच्या तसबिरी काढून टाकणं जितकं सोपं होतं, तितकंच धम्माचं पालन कठीण. त्यामुळे जोर त्यागण्यावर, नाकारण्यावर राहिला आणि स्वीकारण्यात तडजोड होत राहिली. त्यामुळे लोक अहिंदू बनले, पण बौद्ध होऊ शकले नाहीत. अजूनही तो प्रवास सुरूच आहे.
राजकारण नकारात्मकतेवर चालते. त्यामुळे तीच जोपासली गेली. पण नकारात्मकता कधीच प्रगत होत नसते, हे लक्षात घेतलं गेलं नाही. धर्मांतराला 60 वर्षं झाली तरी 22 प्रतिज्ञासारखे विषय आजही बौद्ध धम्मियांच्या मानगुटीवर बसून आहेत. धर्म आणि धम्मातील पुसट रेषा केव्हाच पुसून गेलीय. सुखाचा मध्य मार्ग सांगणाऱ्या बौद्ध धम्मात कट्टरतावाद जोपासला जातोय. उलट बुद्धिझम पद्धतीने सामाजिक, राजकीय वाटचाल करणारे अनुयायी टीकेचे धनी होत आहेत.
दलित ब्राह्मण म्हणून त्यांना हिणवलं जातं. धुडघूस घालणारे लोक समाजाचा चेहरा बनू पाहत आहेत. सगळ्यांना सोबत घेतलं पाहिजे, असं मत मांडल्यावर, 'हे लोक म्हणजे हिंदू लोक कधी सुधारणार नाहीत,' असं एक ढोबळ मत कट्टरतावादी मांडतात.
पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आमूलाग्र विचार परिवर्तन झालेल्या एका हिंदू धर्मीयाचं नेमकं उदाहरण आहे, हे इथे विसरलं जातं आणि त्या पूर्वीची आणि नंतरची जोतिबा फुले ते दाभोलकरांपर्यंत अनेक उदाहरणं आहेत, याकडेही दुर्लक्ष केलं जातं.
लढा नेमका कसला?
मध्यंतरी भाऊ कदम यांच्या गणपती बसवण्याच्या प्रक्रियेत ज्यांनी समाज माध्यमात भाऊ कदम यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या, परिवाराच्या वैयक्तिक स्वातंत्र्याची बाजू घेतली, त्यांना, 'तुमच्यासारख्या लोकांना भर चौकात नागडं करून मारलं पाहिजे,' असं सुनावलं गेलं. 'तुम्ही जर म्हसोबा, खंडोबाला गेलात तर मला तुमच्यावर बहिष्काराचा आदेश द्यावा लागेल,' असं बाबासाहेब म्हणाल्याचं सांगितलं गेलं.
एक तर बाबासाहेब खरंच असं म्हणाले असतील का, हेच शंकास्पद आहे. त्यातही ते म्हणालेही असतील तर त्याला तात्कालिक प्राप्त संदर्भ असू शकतात. परंतु वर्तमान परिस्थितीत ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संवैधानिक मूल्यांचा आधार घेऊन लोकशाही व्यवस्था मजबूत करण्याचा लढा दिला जातोय, त्याला बाबासाहेबांच्याच वक्तव्याचा दाखला देऊन छेद देण्याचं काम एखाद्याला वैयक्तिक आसुरी आनंद देऊ शकतं, पण त्याने एकूणच लढ्याचा पाया ठिसूळ होतो, हे कोणी लक्षात घेत नाही.
उन्मादाला उन्माद हा पर्याय असूच शकत नाही. बाबासाहेबांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात हिंसेचा, शिव्याशापांचा अवलंब कोणत्याही आंदोलनात केला नाही. मग ते महाडच्या तळ्याचा पाणी प्रश्न असो किंवा काळाराम मंदिराचा प्रवेश. आंदोलकांवर हल्ले झाले, पण त्याला हल्ल्याचं प्रत्युत्तर बाबासाहेबांनी कधी दिलं नाही. सध्याच्या भडक जीवनपद्धतीत अशा गोष्टी पचनी पडणं कठीण जाईल, पण हिंसक मार्गांपेक्षा विचार परिवर्तनावर बाबासाहेबांचा भर होता, हे लक्षात ठेवावंच लागेल.
त्रिसूत्री
विषयांची तळमळ, विषयांचा सखोल अभ्यास आणि विषयांची परिणामकारक मांडणी या त्रिसूत्रीवर अख्खा आंबेडकर उभा असलेला आपल्याला दिसतो. तीच त्रिसूत्री आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आत्मसात करणं गरजेचं आहे. या साऱ्यावर नव्याने विचारविनिमय झाला पाहिजे. आंबेडकरी समाजाची निश्चित अशी जगण्याची पद्धती अधोरेखित झाली पाहिजे. आंबेडकरी विचार, बुद्धिझम ही एक जीवनपद्धती आहे, ती निर्भेळपणे आपल्या वर्तनातूनही प्रगट झाली पाहिजे.
आपल्याला हवं तसं धोरण राबवण्यासाठी हातात सत्ता लागते, सत्तेसाठी बहुमत लागतं आणि त्यासाठी बहुमताचं राजकारण करावं लागतं आणि ते सर्वसमावेशक असावं लागतं. त्या राजकारणात समाजात फाटाफूट करणारे भावनिक प्रश्न कमी आणि लोकांच्या दैनदिन प्रश्नांना हात घातला गेलेला असला पाहिजे. लोकांचे जगण्यामरण्याचे प्रश्न अजेंड्यावर असले पाहिजेत. शिवाय त्यांचा मागोवा घेण्याची पद्धत ही प्राधान्याने संवैधानिकच असली पाहिजे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संदर्भातील खुल्या पत्रात बाबासाहेब म्हणतात, "आधुनिक लोकशाहीचे उद्दिष्ट हे अनियंत्रित राज सत्तेवर नियंत्रण घालणे नसून 'लोककल्याण' साधणे हे आहे."
बाबासाहेब पुढे म्हणतात, "लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल रक्ताविरहित मार्गांनी घडवून आणणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही. ज्या शासन पद्धतीमुळे सत्तारूढ मांडीला सामाजिक व आर्थिक क्षेत्रात मुलभूत बदल करता येतात आणि असे बदल ग्रहण करताना जनता रक्तलांछित (हिंसात्मक) मार्गाचा अवलंब करीत नाहीत, तेथे लोकशाही नांदते आहे, असे मी म्हणेन आणि हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे."
त्याचसोबत, लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी संवैधानिक नीतीचे पालन आणि विवेकी लोकमताचीसुद्धा आवश्यकता बाबासाहेब नमूद करतात.
भारताची घटना स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या त्रिसूत्रीवर आधारित आहे. म्हणजेच एका अर्थाने बुद्धाच्या शिकवणीवर आधारित आहे. बुद्धाची शिकवण हा धर्म नसून ती एक आदर्शवत अशी जीवनपद्धती आहे.
धार्मिक रीतीरिवाजापेक्षा या दैनंदिन जीवनपद्धतीला खरे तर प्राधान्य देण्याची गरज आहे. अशी जीवन पद्धती अनुसरणारा समाज घडवणं ही काळाची गरज आहे. किंबहुना भारताच्या घटनेलाही तेच अपेक्षित आहे. कपडे बदलले आणि देव बदलला, रीतीरिवाज बदलले म्हणून धर्म बदलत नसतो. त्याने धर्म बदलल्याचं मानसिक समाधान मिळू शकतं.
धर्म म्हणजे धारणा. तिच्यात बदल होण्यासाठी बदलाच्या प्रक्रियेतून जावंच लागतं. त्यासाठी हवा धीर, संयम, सातत्य. त्याच प्रमाणे घटनेवर केवळ हक्क सांगून उपयोग नाही, तिचं तंतोतंत पालन करणंही आवश्यक आहे. नागरिक म्हणून संवैधानिक मार्गाचा अवलंब आणि बौद्ध धम्माचं पालन या परस्परपूरक गोष्टी आहेत.
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता, असं वातावरण देशात प्रत्यक्षात उतरवणं याहून भारत बौद्धमय करीन, याचा दुसरा अर्थ आणखी काय असू शकतो?
हा अर्थ समजून घेतल्याशिवाय भारतात आंबेडकरी विचारांचा बाबासाहेबांना अपेक्षित लोकशाही व्यवस्था प्रस्थापित करू शकेल, असा राजकीय पर्याय उभा राहणं शक्य नाही.
(डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस नुकताच साजरा झाला. त्यानिमित्त आजच्या आंबेडकरी विचारधारेबद्दल आंबेडकरी चळवळीतल्याच एका कार्यकर्त्यानं मांडलेला हा दृष्टिकोन आहे.या लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)