बुधवार, २० सप्टेंबर, २०१७

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी फेसबूक आंबेडकराईट मूव्हमेंटची भूमिका

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी फेसबूक आंबेडकराईट मूव्हमेंटची भूमिका

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यावरुन वाद उदभवला आहे. त्यावर फेसबूक आंबेडकराईट मूव्हमेंटने अभ्यासपूर्ण माहिती गोळा करुन पुढील भूमिका मांडत आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे मराठवाड्यातील तसेच देशातील एक नामांकित गुणवत्तापूर्ण विद्यापीठ आहे. या विद्यापीठातून अनेक संशोधक, साहित्यिक, कलाकारांच्या पिढ्या तयार झाल्या आहेत. या विद्यापीठाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याकरिता १९७८ ते १९९४ पर्यंत चळवळ उभी राहिली. तिलाच 'नामांतर लढा' किंवा 'नामांतराची चळवळ' म्हटले जाते. या नामांतराच्या चळवळीत नामांतरासाठी सर्व स्तरातून पाठिंबा होता. परंतु, काही छुप्या जातीयवादी नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गोविंदभाई श्राॅफ, अनंत भालेराव, नरहर कुरुंदकर सारख्यांनी व महाराष्ट्र टाईम्स , दै. मराठवाडा सारख्या वृत्तपत्रांनी उघड विरोध करुन मराठवाड्यात जातीवादाची विषे पेरली. त्यामुळे मराठवाड्यात कित्येक ठिकाणी दंगली उसळल्या. याचा फायदा घेत नव्याने तयार झालेल्या तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हातचे खेळणे असलेली 'शिवसेना' या जातीयवादी राजकीय संघटनेने याचा राजकीय फायदा उचलत 'जय भवानी जय शिवाजी' चा नारा देत मराठवाड्यात प्रचंड हिंसा घडवून आणली. कित्येक दलितांच्या घरांची राखरांगोळी झाली, कित्येक लोकांच्या हत्या झाल्या. माताभगिणींवर प्रचंड अत्याचार झाले. गरोदर स्त्रियांवरही सामूहिक बलात्कार झाले. उभी पिके जाळण्यात आली. दलितांची मदत करणाऱ्या सवर्णांची देखील हत्या जातीवादी लोकांनी घडवून आणली. केवळ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करणाऱ्या दलित समाजाची एक अख्खी पिढी बरबाद झाली. १९९४ रोजी विद्यापीठाचे नामांतर झाले आणि ही चळवळ थांबली. सतरा वर्षे फक्त नामांतरासाठी गेली. त्याच १९९४ साली डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यापीठातील पुतळ्यास मंजुरी मिळाली. तो पुतळा बसवण्यासाठी २०१२ साल उजाडले. १८ वर्षे फक्त पुतळा बसवण्यासाठी लागली. एकूण ३५ वर्षे आंबेडकरी जनतेला संघर्ष करावा लागलेला आहे. त्यामुळे समस्त आंबेडकरवादी जनतेसाठी हे विद्यापीठ अस्मितेचे स्थान आहे. त्यांच्या भावना या विद्यापीठाशी जोडल्या गेलेल्या आहेत हे विसरता येणार नाही.

सद्यपरिस्थिती - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सध्या डाॅ. बाळू चोपडे हे कुलगुरु आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचे छुपे समर्थक आहेत. त्यांच्या पत्नी आणि भाऊ संघाशी संबंधित असल्याचे निदर्शनास आले आहे. २०१५ साली मागणी नसताना स्वत: कुलगुरुंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याकरिता ४० लाख रुपये मंजूर केले. २०१५ पासून गेल्या आठवड्यापर्यंत याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. किंवा कुठल्याही सामाजिक, राजकीय संघटनांनी निवेदन सुध्दा दिले नव्हते. कुणाच्याही ध्यानीमनी हा विषय नसताना अचानक राष्ट्रवादीचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतिश चव्हाण, विधानपरिषद आमदार सुभाष झांबड, मा. आ. कल्याण काळे आणि आ. विनायक मेटे व इतरांनी एकत्रितपणे कुलगुरुंना पुतळा बसवण्यात यावा याकरिता निवेदन दिले. आ. वियाक मेटे स्वता:ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्राच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे शिल्पकार म्हणवतात. गेल्या तीन वर्षात एकही वीट न बसवू शकल्याने आपले अपयश झाकण्यासाठी व तमाम शिवप्रेमींचा रोष टाळण्यासाठी त्यांनी या प्रकरणात उडी घेऊन आपली नाचक्की झाकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच घाईघाईत सिनेट सभासदांची मिटींग बोलवली. यामध्ये तडकाफडकी निर्णय घेऊन पुतळ्यासंबंधी निर्णय घेण्याची त्यांची मनिषा असावी. परंतु, विद्यापीठ ही एक स्वायत्त संस्था आहे. तिथे प्रत्येक साध्या आणि छोट्या बाबींमध्ये स्थानिक आमदार, खासदार आणि राजकीय पक्ष हस्तक्षेप करुन दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असतात. गेल्या वर्षीदेखील आ. सतिश चव्हाण यांनी विद्यापीठाचे विभाजन करण्याची मागणी करुन उस्मानाबाद येथे नवीन विद्यापीठ सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. त्याला आंबेडकरवादी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवल्यामुळे कुलगुरुंना निर्णय बदलावा लागला.

आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. आमदार सतिश चव्हाण हे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आहेत. त्यांनी स्वताच्या संस्थेत कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याकरिता उत्साह दाखवला नाही. तीच तत्परता त्यांनी विद्यापीठातील पुतळ्याकरिता राज्यपाल यांना पत्र लिहून दर्शवली. यामध्ये एक निश्चित राजकारण आहे. ते कारण असे की, दोन महिन्यानंतर विद्यापीठातील अधिकार मंडळाच्या निवडणुका आहेत. गेल्या निवडणूकीत सतिश चव्हाण यांचे पॅनेल जिंकले होते. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राजकारण करुन याचा पुरेपूर फायदा निवडणूकीत करुन घेण्यासाठी त्यांनी ही मागणी केली.

या गलिच्छ राजनीतीला पॅंथर्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मा. गंगाधर गाडे आणि पॅंथरसेना प्रमुख सतिश पट्टेकर यांनी कडाडून विरोध केला. दोन्ही संघटना या आंबेडकरवादी संघटना आहेत. मुळात जो आंबेडकरवादी आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा पाईक असतो हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे केवळ द्वेषापोटी किंवा आकसबुध्दीने महाराजांच्या पुतळ्याला या संघटनांनी विरोध केला आहे असे म्हणता येणार नाही.

गेल्यावर्षीपासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जमीन वाटप कार्यक्रम सुरु आहे. पं. दीनदयाल उपाध्याय, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्यानावे अध्यासन केंद्रे उभी केली जात आहेत. विद्यापीठाच्या जमीनीतून कित्येक एकर जमिनी वाटण्यात येत आहेत. त्याठिकाणी त्या त्या राजकारण्यांचे स्मारके आणि पुतळे उभे करण्याचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यासाठी विद्यापीठाचा कोटी रुपयांचा फंड वापरण्यात येत आहे.

विद्यापीठ हे विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी असते. तिथे विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता पैसे न खर्च करता अनेक स्मारकांसाठी पैसे खर्च केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच् निर्णय घेतले जात नाहीत. पेट परिक्षा वेळेवर होत नाहीत. विद्यापीठ होस्टेलमध्ये गेल्या पंधरा दिवसात २ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या होस्टेल्सला सुरक्षारक्षक नाहीत. गर्ल्स होस्टेल सुरक्षित नाहीत. अशा महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष न देता अकार्यक्षम आणि नालायक कुलगुरू राजकीय खिरापती करण्यात व्यस्त आहेत.

थेट प्रश्न असा आहे की आंबेडकरवादू संघटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विरोधात आहेत का ?

तर त्याचे उत्तर आहे की कुठलीही संघटना विरोधात नाही. परंतु, विद्यापीठात विद्यार्थीहित सोडून सर्व राजकीय संघटना राजकीय स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करु पाहत आहेत. या घाणेरड्या राजकारणाचा तमाम आंबेडकरवादी संघटनांमध्ये प्रचंड राग आहे.

तुम्ही विचाराल की आजच का विरोध केला जात आहे ?

विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय आहे. त्या वास्तूच्या लेखी मंजुरीच्या वेळी, बांधकामाच्या वेळी, पूर्णत्वाच्या वेळी कुठल्याही आंबेडकरवादी संघटनेने एका शब्दानेही विरोध केला नाही. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे असलेल्या वसतिगृहाच्या लेखी मंजुरीच्यावेळी, बांधकामावेळी, पूर्णत्वाच्या वेळी विरोध केला नाही. तसेच याच पुतळ्याच्या मंजुरीवेळी २०१५ सालीही कोणीही विरोध केला नाही.

मगच आजच विरोध करण्याचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी केला गेलेला वापर. हे षडयंत्र आंबेडकरवादी संघटनांच्या वेळीच लक्षात आल्याने त्यांनी हा विरोध केला आहे.

समस्त देशाची शान आणि महाराष्ट्रची ओळख जगात ज्यांच्यामुळे आहे, त्यामुळे महाराजांच्या पुतळ्याला कुठल्याही आंबेडकरवादी संघटनेचा विरोध आहे असे कोणीच समजू नये. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची प्रेरणा आहेत. त्यांना विरोध करणारी प्रवृत्ती आंबेडकरवादी किंवा संविधानवादी नाही हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

विद्यापीठ पुतळा प्रकरणावर फेसबूक आंबेडकराईट मूव्हमेंटची भूमिका :

१) विद्यापीठ प्रशासनाने सन २००५-०६ साली एका परिपत्रकाद्वारे असे जाहीर केले आहे की विद्यापीठ परिसरात कुठल्याही पुतळा किंवा स्मारकाला परवानगी देता येणार नाही. यावर  फेसबूक आंबेडकराईट मूव्हमेंटच्या अभ्यास समितीने अभ्यासपूर्वक निष्कर्ष काढत अशी मागणी करत आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे एकत्रित स्मारक विद्यापीठ परिसरातील सोनेरी महाल येथे साकारण्यात यावे.

२) सदरील सोनेरी महाल ही एक ऐतिहासिक वास्तू आहे.याच वास्तूमध्ये स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने कैदेत ठेवले होते. एवढी ऐतिहासिक महत्व असलेली वास्तू दुर्लक्षित राहू नये यासाठी तेथे एकत्रित स्मारक केले जावे. सध्या हा सोनेरी महाल पुरातत्व खात्याचा ताब्यात आहे. येथे अतिशय भव्य स्मारक उभे करता येईल.

३) या स्मारकाकरिता राज्य सरकारने तात्काळ १० कोटी रुपये मंजूर करावेत.

४) तसेच विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृहाचे नुतनीकरण लवकरात लवकर करण्यात यावे.

५) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे आर्थिक दुर्बल विद्यार्थ्याकरिता वार्षिक शिष्यवृत्ती सुरु करण्यात यावी.

६) सदरील पुतळा प्रकरण हे अतिशय सरल असताना त्याला जटील आणि गुंतागुंतीचे करु पाहणाऱ्या अकार्यक्षम कुलगुरु डाॅ. बाळू चोपडे यांची तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी.

- फेसबूक आंबेडकराईट मूव्हमेंट - फॅम महाराष्ट्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा