7 नोव्हेंबर 2017
शिका आणि संघर्ष करा, हा संदेश देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी शाळेत पहिलं पाऊल ठेवलं. म्हणूनच आजचा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा होतो. चला पाहुया, बाबासाहेबांची ही शाळा.
आजच्या दिवशी 117 वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या शाळेत पहिल्यांदा गेले. 7 नोव्हेंबर 1900 साली सातारा येथील सरकारी हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता. आज ही शाळा प्रतापसिंह हायस्कूल म्हणून ओळखली जाते. ही शाळा त्यावेळी पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत होती. चौथीपर्यंत डॉ. आंबेडकर या शाळेत शिकले.

सातारा सरकारी शाळा राजवाडा परिसरात एका वाड्यात भरवली जात असे. आजही हा वाडा इतिहासाची साक्ष देत उभा आहे. हा वाडा 1824 साली छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार प्रतापसिंहराजे भोसले यांनी बांधला. त्यावेळी राजघराण्यातल्या मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था या वाड्यात केली जायची. 1851 साली हा वाडा विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी ब्रिटिश सरकारच्या ताब्यात देण्यात आला.

आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी सपकाळ हे सेवानिवृत्त झाल्यावर साताऱ्यात लष्करी भागात वास्तव्यास होते. तिथेच 7 नोव्हेंबर 1900 या दिवशी सातारा सरकारी शाळेत सहा वर्षांच्या भिवाने प्रवेश घेतला. सुभेदार रामजी यांनी शाळेत घालताना बाबासाहेबांचे आडनाव मूळ गाव आंबावडे म्हणून आंबावडेकर असे नोंदवले. पुढे याच शाळेतील शिक्षक कृष्णाजी केशव आंबेडकरांमुळे बाबासाहेबांचे आडनाव आंबावडेकरवरून आंबेडकर असे झाले.

शाळेच्या रजिस्टरमध्ये भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आहे.

शाळेला शंभर वर्षं झाली तेव्हा 1951 साली या शाळेचं नामकरण छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल असं करण्यात आलं.

"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत मी शिकत आहे, याचा मला अभिमान आहे. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शाळाप्रवेश दिन असे कार्यक्रम शाळेत साजरे होतात. त्यावेळी वक्ते बाबासाहेब किती कष्टातून शिकले याविषयी सांगतात त्यावेळी मलाही गहिवरून येतं. माझी आई घरकाम करते, तर वडील रंगकाम करतात. मला मोठेपणी कलेक्टर व्हायचं आहे." - पल्लवी रामचंद्र पवार, इयत्ता- १०वी

"मी सकाळी वर्तमानपत्र विकून शाळेत शिकण्यासाठी येतो. त्यावेळी मला बाबासाहेबांचे कष्ट डोळ्यासमोर दिसतात आणि मी मनात म्हणतो की माझे हे कष्ट काहीच नाहीत. मी बाबासाहेबांच्या शाळेत शिकतोय याचा मला आनंद आहे. बाबासाहेबांसारखंच मलाही समाजासाठी काम करायचं आहे." - विराज महिपती सोनावाले, इयत्ता- १०वी

"प्रतापसिंह हायस्कूलमध्ये गरीब, गरजू, मागासवर्गीय, कष्टकरी वर्गातील विद्यार्थी कष्ट करून शिकतात. या शाळेत वर्तमानपत्र टाकणारे, कष्ट करणारे विद्यार्थी शिकतात. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आम्ही जतन करतोय याचा आम्हाला आनंद आहे. पण या शाळेला पूर्णवेळ मुख्याध्यापकांची गरज आहे. शाळेची इमारत जुनी झाली आहे, त्यामुळे मोडकळीला आली आहे. नवीन इमारतीची आवश्यकता आहे. शाळेत विद्यार्थ्यांचा पट वाढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय." - एस जी मुजावर, मुख्याध्यापक

सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वर्षांपूर्वी शाळा धोकादायक असल्याने ती दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात यावी असं पत्र दिलंय. हा जुना राजवाडा ऐतिहासिक वास्तू म्हणून नोंद करण्यात आला आहे.

आज प्रतापसिंह हायस्कूलमध्ये पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेची एकूण विद्यार्थी संख्या फक्त 120 इतकी आहे.
संदर्भ :
https://www.bbc.com/marathi/india-41892057
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा