रविवार, ८ जुलै, २०१८

न्यूयॉर्क आणि शिकागोमध्येही फडकतोय आंबेडकरांचा निळा झेंडा

डॉ. गेल ऑमवेट

ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ

13 एप्रिल 2018

प्रतिमा मथळा - भांडवलशाहीमुळे निर्माण झालेल्या वर्गवारीला आंबेडकरांचा विरोध

भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचं मोठं काम डॉ. आंबेडकरांनी केलं. त्याच वेळी जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांचे विचार, सिद्धांत आणि प्रत्यक्ष चळवळ या माध्यमातून त्यांनी भरीव कार्य केलं आहे.


जगाच्या इतिहासात असं योगदान करणाऱ्या ज्या मोजक्या व्यक्ती आहेत. त्यामध्ये बाबासाहेबांचं स्थान अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये आहे. आज ही वस्तुस्थिती निर्विवादपणे मान्य झाली आहे.

बाबासाहेबांची मांडणी, सिद्धांत आणि वैचारिक क्षेत्रातलं एकंदर विचारधन जागतिक पातळीवर शोषणमुक्तीची चळवळ यशस्वी होण्यासाठी एक अत्यावश्यक प्रेरणास्रोत आहे.

हे विचारधन आणि प्रत्यक्ष चळवळींमधला त्यांचा सहभाग, यातून घडवलेल्या परिवर्तनामुळे त्यांचं हे स्थान निर्माण झालं आहे.

डॉ. आंबेडकरांचं सगळ्यांत मोठं योगदान म्हणजे त्यांचे सिद्धांत, ज्यांद्वारे त्यांनी भांडवलशाहीमुळे उदय झालेल्या वर्गांमध्ये बिगरवर्गीयांचं (खालचा स्तर) शोषण लोकांना समजून सांगितलं. डॉ. आंबेडकरांपूर्वी फक्त गौतम बुद्ध, अश्वघोष आणि भांडवलशाहीच्या उदयाच्या कालखंडात ज्योतीबा फुले यांनीच हे काम केलं होतं.

पण देशात आणि आशियातही भांडवलशाहीचा शिरकाव झाल्यानंतर या कामी आंबेडकरांनीच पुढाकार घेतला.

समाजाची सामाजिक-आर्थिक घडी भांडवलशाहीच्या आक्रमणाखाली बसली होती. त्यातून विविध वर्गांचा उदय झाला. पण बिगरवर्गीय शोषणपद्धती तेव्हाही अस्तित्वात होतीच.

या वास्तवाचं भान आपल्या लिखाण आणि सिद्धांतातून आंबेडकरांनी आणलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना समान हक्क मिळावेत म्हणून लढा दिला. आज 21व्या शतकात हेच आंबेडकर जगभरातल्या विविध समान हक्क चळवळीतल्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहेत. महिलांपासून समलैंगिकांपर्यंत आणि अफ्रिकेपासून युरोपापर्यंत ते हजारो तरुण-तरुणींनाजगण्याची उमेद आणि संघर्षासाठी बळ देत आहेत. अशाच लढवय्यांच्या या कहाण्या सांगणारी बीबीसीची सीरिज #आंबेडकरआणिमी 14 एप्रिलच्या आंबेडकर जन्मदिवसाच्या निमित्ताने...

या संदर्भातल्या त्यांच्या संशोधनाचा विषय मुख्यत: जाती व्यवस्थेचे शोषण हा होता. त्यांनी या संदर्भात काही मूलभूत सिद्धांत मांडले.

1. जाती व्यवस्था ही केवळ श्रम विभागणी नाही तर श्रमिक जातींची बंदिस्त विभाजन करणारी व्यवस्था आहे. सामाजिक-आर्थिक कोंडमारा करणारी ही व्यवस्था आहे.

2. या व्यवस्थेनं बिगरवर्गीयांचं शोषण होऊन समाजात विषमता निर्माण झाली आहे. शोषण करणाऱ्या एक-दोन जाती आणि शोषण होणाऱ्या बहुसंख्य श्रमिक जाती, अशी व्यवस्था इथं आहे.पण त्याचबरोबर या बहुसंख्य शोषित जातींमध्येही उच्च-नीचतेची उतरंड आहे. या अंतर्गत शोषणामुळे आणि उच्च-नीचतेमुळे या समाजातही दरी निर्माण झाली आहे. ती बुजल्याशिवाय शोषण होणाऱ्या जातींची एकजूट होणार नाही. परिणामी, जातीय शोषणाची व्यवस्था संपविता येणार नाही, असा कळीचा सिद्धांत आंबेडकरांनी मांडला.

प्रतिमा मथळा - आंबेडकरी विचारांचा प्रभाव भारतातच नाही तर जगभरातल्या समता लढ्यांमध्ये दिसतो

3. हे शोषण थांबवायचं असेल तर केवळ आंतरजातीय विवाह हा उपाय पुरेसा नाही. त्यातून समाजातली सामाजिक विषमता कमी होणार नाही. त्यासाठी खासगी मालमत्तेचा अंत करावा, असं आंबेडकर सुचवतात. म्हणजेच मालमत्ता लोकांच्या नाही तर सरकारच्या मालकीची असावी, असं म्हणत इथं आंबेडकर साम्यवादाचा पुरस्कार करताना दिसतात.

4. सामाजिक लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांच्या संयुक्त पायावर नव्या समाजाच्या निर्मितीची प्रक्रिया घडवावी लागेल. जगाचा अर्थ लावून फक्त ते साधणार नाही. जगाच्या पुनर्रचनेची प्रक्रिया घडवावी लागेल.

5. जोपर्यंत शोषणाचा आधार ठरणाऱ्या धर्म संस्थांना पर्याय दिला जात नाही तोपर्यंत शोषणाचा आधार समूळ नष्ट होणार नाही. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवयान बुद्ध धम्माची मांडणी आणि स्वीकार केला.

अत्यंत थोडक्यात मांडलेल्या या सैद्धांतिक, वैचारिक मांडणीमुळे फक्त जातीव्यवस्थापक शोषणाच्या अंताची दिशा पुढे आली असे नाही.

जगातील बिगरवर्गीय शोषणांचे आणि या शोषणांच्या अंताचे सिद्धांत तयार होण्याचा पाया यातून घातला गेला. वंश, धर्म, लिंग, जमात अशा पायांवर होणाऱ्या शोषणाच्या अंतासाठी आवश्यक असलेली वैचारिक बैठक या सिद्धांतातून जगाला मिळाली.

वंशभेदाविरुद्ध वांशिक शोषणाविरुद्ध ज्या जनचळवळी आज अमेरिकेतली आफ्रिकन-अमेरिकन किंवा कृष्णवर्णीय जनता करीत आहे, त्या जनतेतील तरुण पिढीचे प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकरही बनू लागले आहेत.

प्रतिमा मथळा - लोकशाही हक्क, वंशभेद, जातीय अत्याचार यांना संघटनात्मक विरोध

जगभर चाललेल्या शोषितांच्या लोकशाही चळवळींचे आणि स्त्री मुक्ती चळवळींचे ते प्रेरणाृस्थान आहेत. बाबासाहेबांच्या 125व्या जयंती निमित्ताने अमेरिकेतल्या सैद्धांतिक, विश्वविद्यालयीन विश्वातील आफ्रिकन-अमेरिकन तज्ज्ञ संपूर्ण भारतातल्या विद्यापीठांमध्ये चर्चासत्रांसाठी आले आणि W E B डुबॉय यांच्या आणि बाबासाहेबांच्या संपर्काला उजाळा देण्याचं कार्य झालं.

खंडित झालेली परंपरा पुन्हा उजागर केली गेली.

गेली अनेक वर्षं अमेरिका आणि इंग्लंडमध्ये गेलेल्या भारतीय मूळ असलेल्या माणसांची आंबेडकरी चळवळ बळ धरत चालली आहे. वाढत चालली आहे.

लोकशाही हक्कांच्या, वंशभेद-वांशिक शोषण विरोधी, जातीय अत्याचार विरोधी चळवळींमध्ये कृष्णवर्णीय, मेक्सिकन-अमेरिकन, नेटिव्ह अमेरिकन अशा लोकांचा संयुक्त सहभाग चालू आहे.

न्यूयॉर्क आणि शिकागो सारख्या शहरांमध्ये बाबासाहेबांची प्रतिमा आणि अशोकचक्रांकित निळा झेंडा या सर्वांच्या संयुक्त साक्षीने फडकत आहे.

एक व्यक्ती एक मत अशी समता निवडणुकांवर आधारलेल्या लोकशाहीचा पाया आहे. बाबासाहेबांनी या लोकशाहीचे परिवर्तन सामाजिक लोकशाहीत करण्याची संकल्पना मांडली. संकल्प केला.

त्यासाठी सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील समतेची अत्यावश्यक गरज मांडली. भांडवलशाही आणि ब्राम्हण्यशाही या दोन सत्ता व्यवस्थांचा अंत करण्यासाठी बाबासाहेबांनी विश्लेषण केलं. त्यांनी जगभराच्या संसदीय लोकशाही व्यवस्थांची चिकित्सा केली. व्यक्तिस्वातंत्र्यासह सामाजिक लोकशाही ही बाबासाहेबांनी जगाला दिलेली एक महान विचारप्रेरणा आहे. त्यामुळेच जग या प्रज्ञासूर्याने प्रभावित झालं आहे.

प्रतिमा मथळा - जातीयवादा विरोधातला लढा संसदेत आणखी प्रखर झाला

स्त्री वर्गाच्या शोषणावरही आंबेडकरांनी विचार केलेला होता. इतकंच नाही तर शोषण थांबण्यासाठी लढाही दिला. जातीव्यवस्थेच्या शोषणाचं अस्तित्व हे स्त्रियांच्या शोषणावर आणि त्यांच्या लैंगिकतेवरील हुकुमशाही नियंत्रणावर आधारलेलं आहे.

जातीव्यवस्थेची प्रस्थापना आणि तिचं टिकून राहणं यासाठी स्त्रियांच्या या प्रकारच्या स्त्री म्हणून होणाऱ्या शोषणावर त्यांनी बोट ठेवलं. बाबासाहेबांनी संघटनात्मक, कायदेशीर, घटनात्मक, संघर्षात्मक मार्गांनी यासाठी लढे दिले. बदल घडवले. जगभराच्या स्त्रीमुक्ती चळवळीची ही वैचारिक आणि व्यवहारिक प्रेरणा आहे.

जागतिक पातळीवर पूर्वी आणि आजही शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रस्थापित सामाजिक-आर्थिक संरचना पूर्णपणे मोडण्याची प्रक्रिया कशी होणार या बाबतीचे सैद्धांतिक वाद आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं या संदर्भातलं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे.

मार्क्सवादी सिद्धांतांमध्ये प्रभुत्वात असलेला विचारप्रवाह या बाबत जी मांडणी करतो त्याचा बाबासाहेबांनी सकारात्मक प्रतिवाद केला आहे.

समाज रचनेचा आर्थिक-सामाजिक उत्पादन संबंधांचा पाया आधी मोडल्याशिवाय समाजाचा सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक इत्यादी परिसराचा इमला मोडणार नाही. त्यासाठी पायाला मोडण्यापासून सुरुवात केली पाहिजे, अशी ही मांडणी आहे.

या उलट बाबासाहेबांनी म्हटलं आहे की इमला मोडल्याशिवाय सांस्कृतिक, कायदेशीर, धार्मिक परिसरामध्येच आमूलाग्र बदलाची प्रक्रिया सुरू केल्याशिवाय पाया मोडणारी शक्ती तयारच होणार नाही. जाणीव-जागृती आणि भौतिक उत्पादनासंबंधांचं रंचनांचं वास्तव यांच्या द्वंद्वात्मक संबंधांचा हा सैद्धांतिक तिढा आहे.

प्रतिमा मथळा - डॉ. आंबेडकरांना का जवळचा वाटत होता साम्यवाद?

हा तिढा सोडवणारी जी मांडणी डॉ. आंबेडकारांनी केली आहे, तिच्या मदतीने जगभर चालू असलेल्या या विवादाची कोंडी फुटू शकते. यामुळेही त्यांच्या विचार स्रोतांच्या प्रेरणांचा प्रभाव जगभर निर्माण झाला आहे.

याच प्रमाणे स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, सामाजिक लोकशाही, सर्वहारा वर्गाची हुकुमशाही अशा संकल्पना, आणि त्या आधारावर होणाऱ्या सामाजिक व्यवहारांची सैद्धांतिक चर्चा सुद्धा जागतिक पातळीवर अनेक वर्षांपासून सुरू आहे.

सर्वहारा वर्ग जरी शोषित असला तरी शोषणाला कायमची मूठमाती देणाऱ्या समाजाची निर्मिती अशा वर्गाच्या हुकुमशाहीच्या माध्यमातून होऊ शकते, आणि होणं योग्य आहे. या मांडणीला बाबासाहेबांनी पूर्णपणे आणि ठाम नकार दिला आहे.

कोणत्याही परिस्थितीत अगदी सामूहिक हितासाठी सुद्धा व्यक्तिस्वातंत्र्याचा बळी देता कामा नये. व्यक्तिस्वातंत्र्य आणि सामाजिक लोकशाही यांच्या संयुक्त अवलंबातूनच शोषणमुक्तीकडे जाणं शक्य आहे, अशी त्यांची ठाम मांडणी आहे.

असं साधता आलं नाही तर शोषण मुक्तीसाठी निर्माण केलेली व्यवस्था नव्या शोषणाला जन्म देणारी ठरते, हे बाबासाहेबांचं म्हणणं आज जागतिक पातळीवर सिद्ध झालं आहे.

त्यांच्या विचाराप्रमाणे बहुसंख्या किंवा बहुमत असणं ही लोकशाहीमधील एकमेव निर्णायक शक्ती असता कामा नये. अल्पसंख्य असलेल्या अनेक शोषित विभागांचे शोषणमुक्तीकडे जाण्यासाठीचे स्वातंत्र्य बहुसंख्यांच्या बहुमतानी चालणाऱ्या तथाकथित लोकशाहीमुळे कुजवले जाता कामा नये.

आज जगभर ज्या बहुसंख्या-बहुमत प्रणित सरकारी सत्ता अशी स्वातंत्र्ये संपवण्याचा राजरोस व्यवहार करताना दिसत आहेत, त्या सरकारी सत्तांच्या संदर्भातला लोकशाही संघर्षाचा, जनलढ्याचा आधार बाबासाहेबांचा सिद्धांतच असू शकतो.

हा विचार आज प्रेरणा देताना दिसत आहे.


(लेखिका डॉ. गेल ऑमवेट या इंडो-अमेरिकन विचारवंत, समाजशास्त्रज्ञ आणि मानवी हक्क कार्यकर्त्या आहेत. दलित राजकारण, जातीयवाद निर्मूलनाचा इतिहास यावर त्यांचा अभ्यास आहे.या लेखातील मतं लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.)


संदर्भ : 

https://www.bbc.com/marathi/india-43756471

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा